Sharad Pawar NCP Crisis : शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे ८० टक्के जिल्हाध्यक्ष, अनिल देशमुखांचा दावा | पुढारी

Sharad Pawar NCP Crisis : शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे ८० टक्के जिल्हाध्यक्ष, अनिल देशमुखांचा दावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Sharad Pawar NCP Crisis : राज्यात शिवसेना पाठोपाठ अवघ्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्याने पुन्हा एकदा राजकीय नाट्य रंगले आहे. मूळ पक्ष कुणाचा आणि पक्षाचे अध्यक्ष कोण? यासाठीचा संघर्ष पुन्हा एकदा जनतेला बघायला मिळेल. अशात एनसीपीचे ८० टक्के जिल्हाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत, असा दावा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी केला. पक्षाचे पदाधिकारी मोठ्यासंख्येत पवारांसोबत आहेत. पवारांनी राज्याचा दौरा सुरू केल्यानंतर जिल्हा जिल्ह्यात त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळेल, असा दावा देशमुखांनी केला.

दरम्यान, स्वबळावर सत्तेत येणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर भाजप राज्यात फोडाफोडीचे राजकारण करीत आहे. हा खुला तमाशा जनता बघत आहे. पंरतु, हे सर्व होत असताना सत्ताधा-यांकडून सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. कापूस उत्पादक शेतकरी हतबल आहेत. बेरोजगारीमुळे तरुण नाराज आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे. यासर्व प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असे देखील ते म्हणाले. (Sharad Pawar NCP Crisis)

राज्यातील ओबीसी बांधवांची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी एनसीपीची आहे. अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतीगृह बांधण्याची घोषणा सरकारने केली होती. या ७२ वसतीगृहाच्या बांधकामासंबंधी सरकारने निर्णय घेतलेला नाही. या सर्व प्रश्नांना बगल देत फोडाफोडीचे राजकारण केले जात असल्याचे देशमुख म्हणाले. दरम्यान नुकत्याच झालेल्या शपथविधीपूर्वी प्रफुल पटेल यांनी फोन करून मुंबईला बोलावून घेतले होते. पंरतु, पुण्यावरून मुंबईला जाण्यापूर्वी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर शपथविधी संबंधीचा अंदाज आला होता, अशी स्पष्टोक्ती देशमुखांनी दिली. (Sharad Pawar NCP Crisis)

Back to top button