

धनकवडी: महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर अनेक हरकती नोंदवल्या आहेत. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या विविध भागांमधून जवळपास 1903 हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत. यात प्रभाग क्रमांक 34 मधील (नर्हे-वडगाव) रहिवाशांचा सहभाग लक्षणीय आहे.
महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी गुरुवारी (दि.4) दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ होती. शेवटच्या दिवशी धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात पाच तासांत तब्बल 1550 ऑनलाइन आणि ऑफलाइन हरकती दाखल झाल्या. गेल्या 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत कार्यालयात एकूण1,903 हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. (Latest Pune News)
या हरकतींमध्ये प्रभाग क्रमांक 34 मधील (नर्हे-वडगाव) नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती आणि सूचना नोंदवल्या आहेत. हा भाग प्रभाग क्रमांक 37 किंवा 38 मध्ये समाविष्ट करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
विशेषतः वडगाव बुद्रुक, नर्हे आणि धायरी या प्रभागात धनकवडी गावठाणजवळील आंबेगाव पठार (15 व 16 नंबर) जोडल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या भागातील नागरिकांनी एक हजाराहून अधिक ऑनलाइन आणि ऑफलाइन हरकती दाखल केल्या असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांची मुख्य मागणी हा भाग प्रभाग क्रमांक 37 मध्ये जोडण्याची आहे.
पाच वर्षांपूर्वी महापालिकेत नव्याने 11 गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्या वेळी त्यांचा समावेश प्रभाग क्रमांक 42 करण्यात आला. मात्र या प्रभागातील प्राथमिक समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत.
त्यामुळे, लोकप्रतिनिधींशी सहज संपर्क आणि जवळच्या अंतरावरील क्षेत्रीय कार्यालयामुळे हा भाग प्रभाग क्रमांक 37 किंवा 38 मध्ये जोडला जाणे सोयीचे ठरेल, असे मत हरकतींमध्ये नोंदवण्यात आले आहे.
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या प्रभागांतील नागरिकांनी गुरुवारी (दि.4) शेवटच्या दिवशी पाच तासांत तब्बल 1550 ऑनलाइन आणि ऑफलाइन हरकती दाखल केल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयात एकूण 1903सूचना आणि हरकती नोंदवल्या गेल्या आहेत.
-सुहास महाजन, अधीक्षक, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय