पुणे/ धनकवडी : धनकवडी परिसरात भरधाव कारने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना धडक दिली. या अपघातात जखमी मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याचा आरोप असलेल्या चालकाविरोधात सहकारनगर पोलिसांत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
आर्या दत्तात्रय पिलाने (वय 17) आणि तिची मैत्रीण रितू चंद्रकांत हासूरे (वय 17) या दोघी 29 एप्रिल रोजी रात्री 8.45 वाजता बालाजीनगर येथील पवार हॉस्पिटलसमोरून गणेश मंदिराकडे पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या एमएच 12 डीई 0112 क्रमांकाच्या कारने धडक दिली.
या धडकेत दोघी रस्त्यावर पडल्या. आर्या पिलाने हिला डोक्याला, कानाला, कमरेला आणि पाठीला मार लागला असून, रितू हासूरे हिलाही डोक्याला दुखापत झाली आहे. कारचा चालक अकबर तांबोळी (वय 30, रा. धनकवडी) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप जखमींनी केला. तसेच, या चालकाने यापूर्वीही एलोरा पॅलेस परिसरात दोन ते तीन जणांना धडक देऊन जखमी केल्याची माहिती मिळाली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुढील तपास पीएसआय स्वप्नील लोहार करत आहेत.
...असा घडला अपघात
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीच्या भावाने कार कर्जावर घेतली आहे. हप्ते थकल्याने बँकेचे वसुली एजंट कार नेण्यासाठी आले होते. त्यांनी ती नेऊ नये म्हणून आरोपी ती घेऊन जाण्याच्या प्रयत्नात अपघात झाला.