पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत काम करणे म्हणजे शिस्त असते. पद उपभोगता येत नाही तर ती खरी जबाबदारी असते. मोहोळ ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. त्यांच्या कामाबद्दल अमित शहा यांनी माझ्याकडे कौतुक केले.
शहा म्हणाले, मोहोळ चांगले काम करत आहेत, मोदी शहा कोणाचे कौतुक करत नाहीत. त्यामुळे तुमची ट्रेन योग्य ट्रॅकवर चालली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले. (Latest Pune News)
केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्यअहवाल, त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आणि कोरोना काळातील अनुभवावर आधारित मप्रथम माणूसफ?या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सुनील कांबळे यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, 24 तास जनसंपर्क कार्यालय सुरू ठेवणारे मुरलीधर मोहोळ हे देशातील एकमेव मंत्री आहेत. ते स्वतः पैलवान आहेत.
सगळ्या क्षमतेने पैलवान लढतो, मोहोळ यांनी केंद्रीयमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना याच पद्धतीने लढत आहेत. त्यांनी कोरोना काळात केलेले काम अप्रतिम आहे. या काळात अनेक नेते घरी बसून होते. मात्र, मुरलीधर मोहोळ हे रस्त्यावर उतरून काम करत होते.
चांगल्या काळात कोणीही नेतृत्व करते पण संकटात खरं नेतृत्व समजतं. त्यामुळे त्यांचे नेतृत्व तयार झालं. मोहोळ यांनी त्यांच्या पहिल्या वर्षाचा अहवाल या ठिकाणी सादर केला आहे. पण, मी तुम्हाला सांगतो असली पिक्चर अभी बाकी है. पुढील चार वर्षांत पाच वर्षे मंत्री व तुमचा खासदार म्हणून ते नक्की पूर्ण करतील, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्यातील हेडमास्तर मवाळ तर केंद्रातील कडक : मुरलीधर मोहोळ
आपल्या एक वर्षांच्या कार्यकाळाबद्दल माहिती देतांना राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, एक वर्षात काय काम केलं त्याचा अहवाल सादर करण्याची भाजपची परंपरा आहे. जनसंपर्क कार्यालयामार्फत 24 तास नागरिकांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत. पुणेकरांच्या माझ्याकडून अनेक अपेक्षा असून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
केंद्रात काम करत असतांना याकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता खासदार होतो हे फक्त भाजपमध्येच होतो. राज्यातील हेडमास्तरमुळे मला केंद्रात जाण्याची संधी मिळाली. हे हेडमास्तर मवाळ आहेत. मात्र, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या रूपात कडक हेड मास्टर मिळाले, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.