

Missing Link project Maharashtra
पुणे: ‘पुणे शहर महाराष्ट्राला दिशा देणारे शहर आहे. मुंबई-पुण्याला जोडणार्या ‘मिसिंग लिंक’चे काम 94 टक्के पूर्ण झाले असून, या ‘मिसिंग लिंक’मुळे या मार्गावरील अंतर 6 कि.मी. झाले असून प्रवासाचा अर्धा तास वाचणार आहे. यामुळे भविष्यात पुणे, मुंबईचे आणि एमएमआर रिजन या भागात नवा इकॉनॉमिक कॉरीडॉर तयार करता येणार आहे. त्यामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्यअहवालाचे प्रकाशन, तसेच त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आणि कोरोना काळातील अनुभवावर आधारित ‘प्रथम माणूस’या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झार्लेें त्या वेळी ते बोलत होते. (Latest Pune News)
फडणवीस म्हणाले, ‘छत्रपतींचा इतिहास आणि पुणे या दोघांना कधीच वेगळं करता येणार नाही. छत्रपतींच्या भूमीत वारंवार येण्याची संधी मला मिळते, ही आनंददायी बाब आहे. या कार्यक्रमात येण्यापूर्वी नवी मुंबई विमानतळ आणि पुणे ते मुंबई महामार्गावर घाट भागातील ‘मिसिंग लिंक’ची पाहणी केली. ही ‘मिसींग लिंक’ स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना असून, या मार्गावर देशातील सर्वांत 9 किलोमीटर लांबीचा आणि रुंदीचा तसेच 185 मीटर उंच केबल स्ट्रेट ब्रिज आहे.
त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये हा मार्ग सुरू होणार असून, यामुळे खंडाळा घाटातील मार्ग टाळून पुणे - मुंबईला जाता येणार आहे.
फडणवीस म्हणाले, स्वराज्यातील किल्ले हे जागतिक वारसा व्हावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: प्रयत्न केले. या कमिटीत 20 देश असून, त्या सर्वांचे यावर एकमत होणे गरजेचे होते. मतदान करताना या किल्ल्यांचा स्थापत्य शैलीचा विचार केला गेला. किल्ले बांधतांना माची पद्धत त्यांना वेगळी जाणवली. त्यामुळे सर्व देशांनी या किल्ल्यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता जागतिक झाला आहे.