

कात्रज: महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दक्षिण पुण्यात पाणीकपात करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. मात्र, नागरिकांच्या विरोधानंतर चार दिवसांत हा निर्णय मागे घेण्यात आला. तरही कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात पाणीकपात सुरूच आहे. त्यामुळे या भागावर अन्याय का, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
कात्रज-कोंढवा रोड, सुखसागर, गोकूळनगर, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर, साईनगर, कात्रज, संतोषनगर या भागात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. हा भाग उंच-सखल असल्याचे कारण देत परिसरात कायमच अवेळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. या भागाला पाणीपुरवठा विभाग दुय्यम वागणूक देत असल्याने कायमच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. (latest pune news)
वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून कात्रज पंपिंग स्टेशनद्वारे केदारेश्वर, महादेवनगर आणि आगम मंदिर परिसरातील तीन पाण्याच्या टाक्यांत पाणी सोडले जाते. पाणी पुरवठा विभाग 250 एमएलटी पाणी पुरवठा करत असल्याचे सांगते मात्र, या भागाला अर्धे पाणी मिळत आहे. बाकीचे पाणी कुठे मुरतेय, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
टाक्यांमध्ये पुरेशे पाणी सोडले जात नसल्याने उंच-सखल असलेल्या या भागात कायमच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. जलवाहिन्या फुटणे, गळती होणे, व्हॉल्व नादुरूस्त होणे आदी कारणे देत प्रशासनाकडून वारंवार दुरूस्तीच्या नावाखाली उपनगरांत पाणी कपात केली जात आहे. टाकीत पुरेशे पाणी नाही. पाणी येईल पण कधी हे सांगता येत नाही, अशी उत्तर अधिकारी आणि कर्मचार्यांकडून नेहमीच दिली जात आहेत.
पाणीपुरवठा विभाग शहराचे नियोजन करताना या भागाचा विचार करीत नाही. यामुळे या भागावर आणखी किती दिवस अन्याय होणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष घालून या भागातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
कात्रज-कोंढवा रोड परिसर हा कमी पाणीपुरवठ्याचा टप्पा आहे. त्यामुळे या भागात पूर्वीपासून एक दिवस पाणीपुरवठा बंद असतो. तो काही दिवस तरी तसाच ठेवावा लागणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर धोरण ठरले आहे. मात्र, परिसरात नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- नितीन खुडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
संपूर्ण पुणे शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबत बांधील असलेला पाणीपुरवठा विभाग केवळ कात्रज-कोंढवा रस्ता भागाला दुय्यम वागणूक का देत आहे? या भागात एक दिवस पाणीकपात केली जात आहे. परिसरातील नागरिक कर भरत नाहीत का? मग त्यांच्यावर अन्याय का? शहरातील इतर भागांप्रमाणे या भागात देखील प्रशासनाने पाणीकपात बंद करून नियमित पाणीपुरवठा करावा.
- प्रकाश कदम, माजी नगरसेवक, कात्रज