

पुणे: पोलिसांना टीप देत असल्याच्या कारणावरून एकाच परिसरात राहणार्या पाच जणांनी संगनमत करून 32 वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना म्हातोबाची आळंदी परिसरात घडली.
या प्रकरणात करण शंकर गावडे (वय 19), आदित्य संतोष इंगोले (वय 24) यांच्यासह आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
रोहित सुभाष जावळकर (वय 32, रा. सीतादेवीनगर, म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर) याने याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जावळकर घराजवळ थांबला होता. त्या वेळी आरोपी गावडे, इंगोले आणि त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार तेथे आले. तू पोलिसांना माहिती देतोस, टीप देतोस, असे म्हणत आरोपींनी तक्रारदारास जबर मारहाण केली. (latest pune news)
त्यानंतर हत्याराने त्याच्या वाहनाची तोडफोड करून आर्थिक नुकसान केले आणि परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. पोलिसांनी आरोपी इंगोले याला अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.