

पौड: पौड (ता. मुळशी) येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागेश्वर मंदिरात असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची एका युवकाने विटंबना केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर संतप्त तरूणांनी पौड येथील मशिदीवर शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान दगडफेक केल्याची घटना घडली.
याबाबत शिवाजी वाघवले (रा. पौड) यांनी पौड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून मुस्लिम युवकासह त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी दुपारी तीनच्या दरम्यान चाँद नौशाद शेख (वय १९, रा. पौड) हा युवक नागेश्वर मंदिरात आला. त्याने देवळीत असलेली अन्नापुर्ण देवीचे मुर्ती देवळातून खाली घेवून विटंबना केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. (Latest Pune News)
तत्पूर्वी सायंकाळी रितेश जाधव हे नागेश्वर मंदिरात आल्यानंतर अन्नापूर्णा देवीची मूर्ती हलविली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब शिवाजी वाघवले यांच्या कानावर घातली. वाघवले व जाधव आणि इतर काही जणांनी मांदिरात असलेला सीसीटीव्हीची तपासणी केली असता चाँद हा मुर्तीची विटंबना करत असताना दिसला.
हे कृत्य करणारा कोण आहे व कुठे राहतो याची माहिती उपस्थितीतांना तात्काळ समजली. हे सर्व त्यांच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना चाँदविषयी विचारू लागले असता चाँदचे वडील नौशाद शेख यांनी आलेल्या या तरूणांनाच शिवीगाळ केली.
यानंतर या जमावातील काही जणांनी चाँद शेख व नौशाद शेख यांना मारहाण करून पौड पोलिस स्टेशनला आणले. घटनेचे गांभीर्य ओळखून पौड पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी जमावाला शांत केले तसेच चाँद शेख व नौशाद शेख यांना उपचारासाठी पौड ग्रामीण रूग्णालय व तेथून ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले.
पौड येथील सकल हिंदू समाज, मुळशी तालुका बजरंग दल तसेच वारकरी संप्रदयातील काही जणांनी घटना कळाल्यानंतर पौड येथे धाव घेतली. तसेच पौड येथील मशिदीसमोर ठाण मांडले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधिक्षक दिलीप शिंदे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सुनिलकुमार पुजारी, गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर तसेच इतर पोलिसाचा फौजफाटा पौडमध्ये तैनात करण्यात आला होता.
शांतता राखण्याचे आवाहन
हिंदू देव देवतांविषयी संबंधित युवकाने केलेले कृत्य घृणास्पद आहे. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल. तरी गावातील नागरिकांनी कोणत्याही भूलथापाना बळी न पडता शांत राहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे.