पुणे: महापालिकेच्या विविध विभागांत काम करणार्या कंत्राटी कर्मचार्यांना आणि कुटुंबीयांना आता ई-ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या कर्मचार्यांना राज्य विमा महामंडळामार्फत दिल्या जाणार्या वैद्यकीय सुविधांसह अन्य योजनांचाही फायदा मिळणार आहे.
पुणे महापालिकेच्या स्वच्छता, अग्निशमन, पाणी पुरवठा, आरोग्य आणि सुरक्षा यासह विविध विभागांमध्ये जवळपास 9 ते 10 हजार कंत्राटी कर्मचारी आहे. या कर्मचार्यांना शासनाने ठरवून दिलेल्या सोयी-सुविधा दिल्या जातात. मात्र, अनेकदा ठेकेदारांकडून त्यासंबधीची कार्यवाही केली जात नसल्याने कर्मचार्यांना सोयी-सुविधांपासून वंचित राहावे लागते. (Latest Pune News)
प्रामुख्याने कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकिय सेवांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे ई-ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठेकेदार बहुतांश कंत्राटी कर्मचार्यांना ई-ओळखपत्र दिले नसल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळले होते. त्यामुळे या कर्मचार्यांना वैद्यकिय सुविधांपासून वंचित राहावे लागत होते.
आता सर्व ठेकेदारांना कंत्राटी कर्मचार्यांची त्यांची कुंटुंबियांसह नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देऊन त्यांची केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहेत. यासंबधीचे आदेश अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदिप चंद्रन यांनी दिले आहेत.
प्रत्येक विभागातील पर्यवेक्षीय अधिकार्यांने ठेकेदारामार्फत कर्मचार्यांची आणि त्याच्या कुटुंबियाची माहिती संकलीत करायची असून त्यासाठी पाठपुरावा करावा असेही आदेशात स्पष्ट केले. या सर्व प्रकियेसाठी 31 जुलैपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
...तर कर्मचारी व ठेकेदारांवर कारवाई होणार
अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कंत्राटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचे ई-ओळखपत्र काढण्याची कार्यवाही करायची आहे. त्यात जर कर्मचारी अथवा ठेकेदार या दोघांपैकी कोणीही हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.