सासवड (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ-मृदंग व वीणा घेऊन विठोबा-रखूमाई आणि तुकाराम-ज्ञानोबा नामाचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (दि. 15) दुपारी 1 वाजता प्रस्थान झाले. गुरुवारी पहाटे पूजा, काकड आरती झाली. त्यानंतर श्री चांगावटेश्वर समाधी आणि पादुकांना सत्यवान पांचाळ यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. तसेच वीणापूजन झाल्यानंतर सामूहिक महाआरती झाली. त्यानंतर उपस्थित मानकरी व भाविक यांनी मुखवटा आणि पादुकांचे दर्शन घेतले. हभप चंद्रकांत सूर्यवंशी महाराज यांचे कीर्तन झाले. पादुका पूजनानंतर पालखीने आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले.
टाळ-मृदंगांच्या गजरात, हरिनामाचा जयघोष करीत पालखी सासवड शहरातून जेजुरी नाका येथे आल्यानंतर सासवड नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी निखिल मोरे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदुकाका जगताप, संजय चव्हाण यांसह नगरसेवकांनी दिंड्यांचे स्वागत केले. पालखीसोहळा प्रमुख हभप जनार्दन (आप्पा) वाबळे यांनी ही माहिती दिली.
पालखी समवेत 27 दिंड्या आहेत. रथासाठी हभप बबन महाराज दोरगे यांची, तसेच नगारखान्यासाठी बबन महाराज कुदळे यांची बैलजोडी आहे. ज्ञानदेव कृष्णाजी काटे यांचा मानाचा अश्व आहे, असे चोपदार बाळासाहेब जगताप यांनी सांगितले. प्रस्थानप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, विजय शिवतारे, मिनाज मुल्ला, विक्रम रजपूत, अमिता पवार, आरोग्य अधिकारी विक्रम काळे, स्वाती दहिवाल, अरविंद वनमोरे, पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप आदी उपस्थित होते.
हे ही वाचा :