Deenanath Hospital tax dues
पुणे: तनीशा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे अजूनही तब्बल 28 कोटी रुपयांची कराची थकबाकी आहे. या करवसुलीसंदर्भात रुग्णालयाला पुन्हा नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती मिळकतकर विभागाने दिली. दरम्यान, करमाफीसंदर्भात सध्या कोर्टात केस सुरू आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहितीदेखील कर विभागाने दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने तनिशा भिसे यांचा मृत्यू झाला. त्यांना पैशांची मागणी करण्यात आल्याने त्यांना वेळेत उपचार देता आले नसल्याने या रुग्णालयावर टीकेची झोड उठली होती. यानंतर रुग्णालयाकडे असलेल्या थकबाकीचा विषयदेखील समोर आला होता. (Latest Pune News)
रुग्णालयाकडे तब्बल 28 कोटी रुपयांची थकबाकी असून महापालिकेने रुग्णालयाच्या मिळकतकर थकबाकीचा हिशेब करून रुग्णालयाकडे सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 23 कोटी रुपये भरण्यासंदर्भात नोटीस बाजवली होती. ही थकीत रक्कम रुग्णालयाने अद्याप भरली नसल्याने रुग्णालयाला पुन्हा नोटीस बजावली जाणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मिळकतकर थकबाकीचे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. धर्मादाय ट्रस्टच्या आधारे रुग्णालयाला मिळकत करात सवलत मिळावी अशी त्यांची मागणी आहे.
तसेच मिळकत करातील सर्वसाधारण मिळकत करात 50 टक्के सवलत देण्याची मागणी रुग्णालयाने केली होती. त्यानुसार रुग्णालयाला मिळकत कराचे बिल महापालिकेकडून देण्यात आले. परंतु त्यांनतरही थकबाकी राहिल्याने आता महापालिकेने रुग्णालयाला पुन्हा नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.