

टाकळी भीमा: जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोेचवण्याचे उद्दिष्ट शासनाकडून ठेवण्यात आले आहे. या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असला तरी शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जलजीवन मिशन योजनेची गावातील कामे अपुरी असून, त्याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे मोठ्या दिमाखात सुरू करण्यात आली होती. परंतु अनेक गावात ही कामे मुदत संपूनही अद्याप अपुरीच राहिली आहेत. यामध्ये वाडी-वस्तीवरील जलवाहिनीची वितरण व्यवस्था, पाण्याच्या टाक्या, जॅकवेल, पंपगृह बांधणे यासारख्या पायाभूत कामांमध्ये अर्धवटपणा आहे. त्यामुळे नागरिकांना अपेक्षित आणि वेळेवर पाणी मिळत नाही. (Latest Pune News)
सध्या पावसाळ्याचे दिवस असूनदेखील तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसाळ्यामध्ये पाण्याच्या स्रोतांमध्ये वाढ होऊन नळाला येणारे पाणी अनेक ठिकाणी दूषित येते. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, यामुळे पोटदुखी, जुलाब, त्वचारोग, कावीळ यासारख्या समस्या वाढू लागल्या आहेत.
या कामांची जबाबदारी घेतलेल्या काही ठेकेदारांनी बिले मिळत नाहीत, म्हणून कामे रखडवली आहेत. रखडलेली कामे पूर्ण करण्यास ते टाळाटाळ करीत असल्याने अनेक गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाकडून या अपूर्ण कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करूनही जलजीवन मिशनचे उद्दिष्ट शिरूर तालुक्यात पूर्ण होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांची नाराजी वाढत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शिरूर तालुक्यातील 47 गावांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. त्यापैकी 28 गावांतील किरकोळ कामे बाकी असूनदेखील पाणीपुरवठा सुरू आहे. 19 गावांची कामे बिलाअभावी रखडली आहेत. निधी नसल्याने ठेकेदार कामे करत नाही. निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवलेले आहेत. या योजनेसाठी शासनाचा निधी वेळेवर मिळत नाही. निधी वेळेवर मिळाला असता तर वेळेत काम पूर्ण झाले असते.
- सतीश पवार, उपअभियंता, शिरूर