बाणेर : पुढारी वृत्तसेवा : औंध येथील स्मशानभूमीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम रेंगाळल्याने गेल्या चार महिन्यांपासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अंत्यसंस्कार करायला आलेल्या मृतांच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 15) जागेअभावी एका व्यक्तीच्या मृतादेहावर जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. औंध येथील स्मशानभूमीचे काम आमदार निधीअंतर्गत गेल्या जानेवारी महिन्यात सुरू झाले आहे. या कामासाठी जवळपास 50 लाख रुपयांचा निधीची तरतूद केली आहे. चार महिने होऊन गेले तरीही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
एकाच वेळी दोनपेक्षा जास्त अंत्यसंस्कार करायचे झाल्यास या ठिकाणी ते शक्य होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या येथील सुरू असलेल्या कामामुळे या ठिकाणी एका वेळी दोनच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तसेच, विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याचा पर्याय नागरिकांना निवडावा लागत आहे. मात्र, काही नागरिक विद्युतदाहीनीचा पर्याय निवडत नाहीत, त्यांना जमिनीवर लाकडे रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. स्मशानभूमीतील मंदिर हलविणार
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले की, स्मशानभूमीच्या कामाला काही अडचणींमुळे विलंब झाला आहे. स्मशानभूमीच्या मध्यभागी असलेले मंदिर दुसर्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याने या कामास विलंब होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यांत स्मशानभूमीचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रशासनाने स्मशानभूमीसारखी कामे तरी वेळेचे भान ठेवून करणे आवश्यक आहे. या स्मशानभूमीत बुधवारी (दि. 15) जमिनीवर लाकडे रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. या स्मनशानभूमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
-राहुल जुनवणे, नागरिक
हेही वाचा