

पुणे/खडकवासला: खडकवासला पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणातून करण्यात येणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता 2 हजार 76 क्युसेक एवढा विसर्ग कायम ठेवण्यात आला होता. तरीही पावसाच्या प्रमाणानुसार व पाण्याच्या येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
सध्या चारही धरणांमध्ये पाणीसाठा सुमारे 10 टीएमसी आहे. मागील वर्षी हाच साठा साडेतीन टीएमसी होता. विसर्गातून आत्तापर्यंत सव्वा टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. (Latest Pune News)
खडकवासला साखळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. दिवसभरात टेमघर परिसरात 7 मिमी, वरसगाव परिसरात 9 मिमी, तर पानशेत परिसरात 12 मिमी पाऊस झाला. खडकवासला परिसरात केवळ एक मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली.
जलसंपदा विभागाने शुक्रवारी 4 हजार 565 हजार क्युसेकने विसर्ग मुठा नदीपात्रात सोडला होता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हा विसर्ग शनिवारी सकाळी 11 वाजता 2 हजार 76 करण्यात आला. पावसाचा जोर कमी-जास्त झाल्यास विसर्गदेखील कमी-जास्त करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
खडकवासला धरणसाखळीत 34 टक्के पाणीसाठा
खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांमध्ये एकूण पाणीसाठा आता 9.91 टीएमसी अर्थात एकूण क्षमतेच्या 33.98 टक्के झाला आहे. मागील 24 तासांमध्ये या साठ्यात पाव टीएमसीहून अधिक पाणी जमा झाले आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून करण्यात येणार्या विसर्गामुळे मुठा नदीतत्तापर्यंत सव्वा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे, तर चारही धरणांमध्ये 230 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू आहे.