

पुणे: लग्नाच्या नादात एका 85 वर्षीय ज्येष्ठावर 11 लाख 45 हजार रुपये गमाविण्याची वेळ आली आहे. सायबर ठगांनी प्रेमाचे जाळे टाकून ही फसवणूक केली आहे. वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली हे पैसे उकळण्यात आले आहेत.
याप्रकरणी, बिबवेवाडी येथील ज्येष्ठाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलिसांनी सायबर ठगांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 एप्रिल ते 1 जून 2025 या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडला आहे. (Latest Pune News)
फिर्यादी ज्येष्ठ नागरिक बिबवेवाडी परिसरात राहण्यास आहेत. ते सेवानिवृत्त असून, काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना लग्न करायचे होते. 18 एप्रिल रोजी घरी असताना त्यांना एका विवाहविषयक संस्थेबाबत माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी तेथे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्या वेळी त्यांच्यासोबत अकांक्षा पाटील नावाच्या महिलेने संपर्क साधला. ज्येष्ठाकडून पंधराशे रुपये ऑनलाइन नोंदणी शुल्क भरून घेतले. यानंतर महिलेने त्यांना एक मोबाईल क्रमांक दिला. ममता जोशी नावाची महिला वधू असतील, असे त्यांना सांगण्यात आले.
ज्येष्ठाने अकांक्षा हिने दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी ममता या महिलेने आपले वय 57 वर्ष असल्याचे सांगून लग्न करायचे असल्याचे सांगत ज्येष्ठाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यांचा विश्वास संपादन करत बोलणे सुरू ठेवले.
काही दिवसानंतर ममता हिने आपली मावसबहीण आजारी असल्यामुळे, कोल्हापूर येथे आल्याचे सांगितले. काही दिवसानंतर ममता हिने आपला स्वतःचा अपघात झाला असून, पायाला दुखापत झाली आहे. वैद्यकीय उपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे. पुण्यात आल्यानंतर पैसे परत देईल, असे सांगितले.
दरम्यान, फिर्यादी ज्येष्ठालादेखील ममता हिचे बोलणे खरे वाटले. त्यांनी वेळोवेळी तिच्या बँक खात्यावर 11 लाख 45 हजार 350 रुपये पाठवून दिले. ममता परत ज्येष्ठाकडे पैसे मागू लागली, त्या वेळी त्यांना संशय आला.
परंतु, तोपर्यंत ज्येष्ठांची साडेअकरा लाखांची फसवणूक झाली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याबाबत सुरुवातीला शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिली.