खडकवासला: नर्हे परिसरातील रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, कचरा आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कृष्णाईनगर येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तसेच या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावर तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली होती.
सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गुलाबाची झाडे लावून गांधीगिरीच्या मार्गाने या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Latest Pune News)
आंदोलन सुरू झाल्यापासून तीन तासांचा कालावधी उलटूनही महापालिकेचे अधिकारी आंदोलनाकडे न फिरकल्याने नागरिक संतप्त झाले. अखेर पाच तासांनंतर अधिकार्यांशी चर्चा झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त श्रद्धा पोतदार यांनी मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वसन या वेळी आंदोलकांना दिले.
आंदोलनस्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दायगुडे, वाहतूक शाखेचे अधिकारी राजकुमार बर्डे, प्रभाग अधिकारी विजय वाघमोडे, महापालिकेचे अभियंता विजय वाघमोडे, निशिकांत छापेकर आणि शुभम देशमुख यांनी भेट दिली.
या आंदोलनात राजाभाऊ जाधव, मिलिंद मराठे, संजय सुर्वे, गणेश निंबाळकर, विठ्ठल सूर्यवंशी, हरीश वैद्य, प्रशिक दारुंडे, लतिफ शेख, सुनील पडेर, सूरज दांगडे, सुशील भागवत, विशाल खरात, अजय घारे, सोनाली नायर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नर्हे परिसरातील रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेज लाईन, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा या समस्यांवर महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात. याबाबत कार्यवाही न झाल्यास मुंबई-बेंगलोर महामार्गवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
- भूपेंद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ते