वाल्हे: पुरंदर तालुक्यातील दौंडज परिसरामधील खरीप हंगामातील बाजरीचे पीक चांगले आले आहे. मात्र, ऐन फुलोर्यात असलेल्या बाजरीच्या कणसांना पावसाची नितान्त गरज भासत असताना पाऊस नसल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेल्या बाजरी पिकाचा घास जातोय की काय? या विचाराने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
‘बाजरीचे आगर’ म्हणून प्रचलित असलेल्या या परिसरात मागील तीन वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस होत होता. यामुळे या परिसरातील खरीप हंगामातील बाजरीचा पेरा घटला होता. परंतु, यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने वाल्हे व परिसरातील पिसुर्टी, दौंडज, पिंगोरी, कवडेवाडी, जेऊर, मांडकी, राख, नावळी आदी परिसरात बाजरीचा पेरा तसेच खरीप हंगामातील पिकांचा पेरा वाढला आहे. परंतु, पुढील काही दिवसांतच पाऊस पडला नाही, तर बाजरी पीक धोक्यात येणार असल्याची माहिती येथील शेतकरीवर्गाने दिली.(Latest Pune News)
या वर्षी खरीप पिकांच्या हंगामापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाला. या ओलीवर शेतकर्यांनी बाजरीची पेरणी केली. भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन आदी तेलबियांची या वर्षांत विशेष लागवड झाली तसेच तूर, मूग,उडीद अशा विविध प्रकारच्या पिकांच्या
पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पेरणी झाल्यानंतर पावसाची संततधार सुरुवातीला थोडे दिवस होती. त्यामुळे यंदा समाधानकारक उतारा मिळेल, असा अंदाज शेतकर्यांनी वर्तविला होता.
आता मात्र परिसराला पावसाने हुलकावणी दिली आहे. परिणामी, जिरायती भागातील पिके ऐन पावसाळ्यात कोमेजू लागली असून, खरीप हंगामातील पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत.
सध्या शेतपिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. पाऊस लवकर पडला नाही तर बाजरी पिकांसह अन्य पिकांना याचा फटका बसणार आहे. दौंडज व परिसरात बाजरी पीक फुलोर्यात आले आहे. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे पीक धोक्यात येत आहे. त्यामुळे बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली आहे.
- रमेश घोगरे, शेतकरी, दौंडज