

उमेश कुलकर्णी
दौंड: दौंड-पुणे रेल्वेमार्गावरील प्रवाशांची स्थिती सध्या अत्यंत दुःखदायक आहे. दररोज नोकरी, कॉलेज, व्यवसाय आणि इतर छोटे-मोठे उद्योग करणारे प्रवासी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात, तरीही स्थानिक रेल्वे प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून आवश्यक ती सोय करण्यात आलेली नाही.
दौंडकऱ्यांचा आरोप आहे की, दौंड जंक्शन हे देशातील महत्त्वपूर्ण रेल्वे केंद्र असून, बारामतीकरांनी यावर नेहमीच दुजाभाव केला आहे. ’दौंडचे महत्त्व वाढले तर बारामतीकरांची किंमत कमी होईल’ असे मत दौंडकरांनी व्यक्त केले. निवडणुकीपूर्वी आश्वासने देणारे नेते निवडणूक पार पडल्यावर पुन्हा दौंडकडे दुर्लक्ष करतात, असाही आरोप नागरिकांचा आहे.
सध्या सकाळी 7.05 वाजता दौंडहून सुटणारी शटल व बारामतीहून पुण्याकडे जाणारी डेमू प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. त्यामुळे पाटस, केडगाव, यवत, कडेठाण, उरुळी कांचन, मांजरी, हडपसर इत्यादी स्थानकांवरून प्रवास करणाऱ्यांना कधी लोंबकळत, तर कधी चेंगराचेंगरी करत प्रवास करावा लागतो, ज्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो आहे.
रेल्वेस्थानकावर नव्याने केलेल्या पुलाला सरकते जिने किंवा लिफ्ट नाही. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. तिकीट खिडकी व मोठ्या प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांना धावपळ करावी लागते. जर प्रवासी पडला किंवा जखमी झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेईल, असा सवाल प्रवाशांमध्ये आहे.
महिला प्रवाशांची सुरक्षितता देखील गंभीर आहे. कोरोनाकाळात दुपारी 12.05 वाजता दौंड-पुणे डेमू बंद झाली असून, ती पुन्हा सुरू केली जावी, अशी प्रवाशांची मागणी आहे सकाळी 8.15 वाजता बारामती-पुणे डेमू गेली की प्रवाशांना हक्काची सेवा उपलब्ध होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाने उरुळी-कांचन, हडपसर येथे नव्याने टर्मिनल सुरू केले आहे, तर दौंडकडेही जागा, पाणी, लाईट व इतर सोयी उपलब्ध असूनही प्रवाशांवर हा अन्याय का, असा सवाल जनता विचारू लागली आहे. स्थानिक नेते निवडणुकीपूर्वी रेल्वे प्रश्न मांडतात. परंतु निवडणुकीनंतर मुद्दाम दुर्लक्ष करतात. खासदार सुप्रिया सुळे याही काही वर्षांपूर्वी रेल्वेप्रश्नावर आग््राही राहिल्या. परंतु आता प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष नसल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.