

दौंड: दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अमोल शंकर विटकर (रा. बोरावकेनगर, दौंड) आणि असीम कासिम उर्फ असिफ कासम कुरेशी (रा. खाटीक गल्ली, दौंड) यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वी शरीराविरुद्धचे गुन्हे, नागरिकांमध्ये भीती व दहशत निर्माण करणे, धमकावणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या विविध गंभीर स्वरूपाच्या घटनांची नोंद दौंड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याशिवाय असीम कासिम उर्फ असिफ कासम कुरेशी याच्याविरुद्ध गोवंशाशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन करून धार्मिक भावना दुखावल्याचेही अनेक गुन्हे दाखल आहेत.
या दोन्ही आरोपींच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध तडीपार कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, दौंड यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी रेवनाथ लबडे यांनी अमोल शंकर विटकर आणि असीम कासिम उर्फ असिफ कासम कुरेशी या दोघांना पुणे शहर पोलीस आयुक्तालय व महानगरपालिका हद्दीसह पुणे, सोलापूर, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या हद्दीतून पुढील एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाची दोन्ही आरोपींना विधिवत बजावणी करण्यात आली असून त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी रवाना करण्याची आवश्यक कार्यवाहीही पोलिसांनी पूर्ण केली आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.