खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील राजगड (वेल्हे) तालुक्यातील दुर्गम दापसरे-कुर्तवडी परिसरात देवराई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्य पाहरे, चौक्या, कोकण दिवा-रायगड राजमार्ग आदी शिवकालीन ठेवा आजही जिवंत आहे. माडांच्या गगनचुंबी डौलदार वृक्षांसह अनेक दुर्मीळ वनौषधींचे वरदान या परिसराला लाभले आहे. धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून डोंगर-टेकड्यांची बेसुमार कत्तल केली आहे. मात्र, वन खात्याच्या मालकी जागेतील देवराई, शिवकालीन देवस्थाने, ऐतिहासिक वास्तू तसेच काही जागरूक मावळ्यांनी वडिलोपार्जित जमिनी सांभाळून माड, करंज, कढीपत्ता आदी वृक्षांची जोपासना केली आहे. त्यामुळे हा परिसर पर्यटकांचे, शिवप्रेमी गिर्यारोहकांचे आकर्षण बनला आहे.
पुणे शहरापासून 75 ते 90 किलोमीटर अंतरावर घोल, गारजाईवाडी, कशेडी, दापसरे, कुर्तवडी, टेकपोळे, माणगाव आदी गावे आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगातील उंच डोंगरकडे कपारीत, माथ्यावर बहुतेक गावे, वाड्या-वस्त्या आहेत. गावांचा परिसर चोहोबाजूंनी गर्द हिरव्यागार वनराईने बहरलेला आहे. दापसरे येथील शिवकालीन देवराई वन खात्याकडे आहे. या परिसराला शंभूची पेठ म्हणून ऐतिहासिक ओळख आहे. या ठिकाणी जखमीमाता मंदिर, शिवकालीन महादेव मंदिर आहे. येथे शिवकाळात बाजारपेठ होती. घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी हा सर्वांत जवळचा मार्ग असल्याने धान्य, कपडे आदी मालाची बैल, घोड्यांवरून वाहतूक सुरू होती. या मार्गाने आजही कोकणात बैल, शेळ्या, गायी-म्हशींची तसेच अन्नधान्याची वाहतूक होत आहे. पानशेत, पुणे दूर अंतरावर असलेल्याने या परिसरातील रहिवासी आजही बाजारहाट, औषधे, पाणी, शिक्षणासाठी कोकणात ये-जा करतात.
मार्च ते मे महिन्यात माडीचा हंगाम असतो. पावसाळ्यात गगनचुंबी माडाच्या झाडावर चढून माडी काढणे धोकादायक असते. त्यामुळे पावसाळ्यात माडी काढली जात नाही.
शिवकाळापासून आम्ही माडांच्या तसेच इतर बहूपयोगी झाडांची लागवड आणि जोपासना करीत आहे. माडाचे बी लावून रोपे तयार केली जातात. रोप लावल्यानंतर 10 ते 12 वर्षांनंतर माडी मिळण्यास सुरुवात होते. एक लिटर माडी शंभर रुपये दराने विक्री केली जाते.
– शंकर केळतकर पाटील, शेतकरी, दापसरे (ता. राजगड)
कोणत्याही प्रकारची घातक रसायने न टाकता शुद्ध माडी आरोग्यवर्धक असल्याने तिला उन्हाळ्यात जादा मागणी असते. अनेक पर्यटक तसेच पुण्या-मुंबईतील नागरिक माडी पिण्यासाठी या परिसरात गर्दी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकर्यांना रोजगारही मिळत आहे.
– मधुकर कडू, माजी सरपंच, कुर्तवडी
दापसरे येथील देवराईत व परिसरात अनेक दुर्मीळ शिकाकाई, अंजन, गुलम, करंजा, दालचिनी, कढीपत्ता, लवंग, कोकम, तमालपत्र आदी वृक्ष, वनौषधी मुबलक प्रमाणात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दापसरे येथील आंबी नदीच्या उगमस्थळावर पाण्याचे तळे खोदले. निघुनीचे पाणी म्हणून या तळ्याची ख्याती आहे. हे पाणी पिण्यासाठी पाचाड, रायगडावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी घोड्यांवरून जात असे.
– रोहित नलावडे, कार्यवाहक, मावळा जवान संघटना
हेही वाचा