यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यात गर्दीवर अंकुश; काय आहे नियोजन?

यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यात गर्दीवर अंकुश; काय आहे नियोजन?

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान गेल्या वर्षी मंदिरात प्रवेश मिळविण्याच्या झटापटीत वारकरी आणि पोलिस यांच्यात उडालेल्या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर यंदा मंदिरातील गर्दीवर अंकुश लावण्याबाबत प्रशासन प्रामुख्याने विचार करीत आहे. गर्दी आटोक्यात आणण्याबाबत करण्यात येणार्‍या उपाययोजनांचा आढावा सुरू असल्याचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी येथे पार पडलेल्या बैठकीत पालखी प्रस्थान सोहळा आढावा बैठकीत दिसून आले.

पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर, तहसीलदार प्रशांत बेडसे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी सभापती डी. डी. भोसले पाटील, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, सागर भोसले, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. ऊर्मिला शिंदे, डॉ. इंदिरा पारखे यांच्यासह महसूल, आरोग्य, विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. देवस्थान विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी नदीपलीकडील हवेली भागातील दर्शनबारीसाठी असलेली जागा संबंधित जागामालकाकडून प्रशासनातर्फे 15 जूनपर्यंत देवस्थानला मिळावी, अशी या वेळी मागणी केली. त्यामुळे दर्शनमंडप बांधणीसाठी व त्यातील इतर सुविधांसाठी पुरेसा वेळ मिळेल. वारकरी भाविक 7 ते 8 तास दर्शनबारीच्या रांगेत उभे असतात. भाविकांना स्वच्छतागृहाची सुविधा योग्य त्या ठिकाणी व्हावी, अशी मागणी देखील या वेळी करण्यात आली.

वाहन पासचा गैरवापर

आळंदी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सांगितले की, वाहन पासचा गैरवापर होतो. तो टाळता यावा, यासाठी उपाययोजना व्हावी. रस्त्यावर वाहने पार्किंग होतात ती उचलण्यात येतील, तर पोलिसमित्र व खासगी संघटनांनी मंदिरात अनावश्यक असतात त्यांना मंदिरात प्रवेश देऊ नये, असे आळंदी पोलिस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले.

बाहेरगावचे खांदेकरी नको

आळंदी ग्रामस्थांच्या वतीने माजी सभापती डी. डी. भोसले पाटील यांनी वारकरी, भाविकांसाठी नदीपलीकडील दर्शनबारीसाठी असलेली जागा लवकर देवस्थानला मिळावी. त्यामुळे तिथे वारकर्‍यांसाठी सुविधा देवस्थानमार्फत होतील. गावातील खांदेकरी ग्रामस्थांवर अन्याय होऊ नये. गावाबाहेरच्या व्यक्तीला खांदेकरी म्हणून प्रवेश देऊ नये. पालखीला आळंदीतीलच खांदेकरी असावा.

पालखीसाठी सत्तावीसशे फिरत्या शौचालयांची व्यवस्था

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी 1 हजार 500, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 1 हजार आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी 200 अशा एकूण 2 हजार 700 शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून देण्यात आली.

पालखी सोहळ्यामध्ये याशिवाय 140 रुग्णवाहिका आणि 57 रुग्णवाहिका पथक, 112 वैद्यकीय अधिकारी, 336 आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी 200 टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, तात्पुरते शौचालय, आरोग्य तपासणी, पालखी तळाचे सपाटीकरण, इंधन आणि वीजपुरवठा, शोषखड्डे, तात्पुरता निवारा केंद्र, आरोग्य किट आदींची व्यवस्था करण्यात येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news