रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : मलठण व परिसराला वारंवार भेडसावणारा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. अखेर सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मलठण गावाला गावातीलच सबस्टेशनमधून विद्युतपुरवठा करण्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे सरपंच पार्वती परदेशी यांनी सांगितले.
मलठण गावाला गेल्या अनेक वर्षांपासून विजेच्या अनेक समस्या होत्या. वेळेवर वीज मिळत नव्हती. दररोज लाइन फॉल्ट हे कारण नित्याचेच ठरलेले. याचा परिणाम अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायधारक तसेच ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. गावात सबस्टेशन होते. पण, त्याचा वीजपुरवठा गावाला होत नव्हता. गावातील सबस्टेशनचा वीजपुरवठा गावाला व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी सात वर्षांपासून लावून धरली होता. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनही केले. परंतु, त्याला यश आले नव्हते.
अखेर मलठण ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पदाधिकार्यांनी महावितरण कार्यकारी अभियंता सुहास दरवडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली व विजेसंदर्भात गावच्या व्यथा मांडल्या. तसेच मलठण गावाला मलठण सबस्टेशनमधून 24 तास थ्री फेज फीडर चालू करण्याची विनंती केली. गावकर्यांच्या विनंतीला मान देऊन चार दिवसांपूर्वीच मलठण सबस्टेशनमधून गावाला वीजपुरवठा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली. त्याबद्दल कार्यकारी अभियंता सुहास दरवडे, उपकार्यकारी अभियंता विक्रम चव्हाण, अमित धोत्रे यांचे गावकर्यांकडून आभार मानण्यात आले.
हेही वाचा