हडपसर परिसरात धोकादायक होर्डिंग; नागरिकांची कारवाईची मागणी

हडपसर परिसरात धोकादायक होर्डिंग; नागरिकांची कारवाईची मागणी
Published on
Updated on

हडपसर : पुढारी वृत्तसेवा : हडपसर, मांजरी परिसरात सोलापूर रोड, सासवड रस्त्यासह महापालिकेच्या हद्दीत ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. होर्डिंग व्यावसायिकांनी रस्त्यांवर आवाढव्य आकाराची होर्डिंग उभारली आहेत. महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सोलापूर महामार्गवरील मांजरी बुद्रुक, तर सासवड मार्गावर फुरसुंगी, उरुळी देवाची, वडकी आदी गावांच्या हद्दीत शेकडो होर्डिंग्ज उभारले आहेत. त्यातील अनेक होर्डिंग अनधिकृत व धोकादायक आहेत. वादळ-वार्‍यांत नुकसान झालेले होर्डिंगही तसेच उभे आहेत. परिसरातील अनेक होर्डिंगसाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सोलापूर महामार्गावरील लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाका या मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत अनेक होर्डिंग धोकादायकपणे उभी आहेत.

महादेवनगर मांजरी रस्ता, मुंढवा-मांजरी रस्ता, मांजरी- शेवाळवाडी रस्ता, द्राक्ष संशोधन केंद्र ते मांजरी गाव रस्ता आदी चौकांत व रस्त्यांवर तर या होर्डिंगचा कहरच झाला आहे. टोलनाक्याच्या परिसरात कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत भव्य आकाराची होर्डिंग्ज उभारली आहेत. यातील अनेक होर्डिंग्जची बांधणी जुनी असल्याने ते केव्हाही कोसळण्याचा धोका आहे. घाटकोपर येथे नुकतेच होर्डिंग कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे, या पार्श्वभूमीवर हडपसर परिसरात अनधिकृत होर्डिंग लावण्यावर कायमस्वरूपी बंदी यावी, अशी मागणी हडपसर नागरिक मंचाने केली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत होर्डिंगधारकांना नोटीस दिलेल्या होत्या, मात्र होर्डिंग उतरविण्यात आले नाहीत.

या ठिकाणांचा समावेश

सोलापूर महामार्ग लक्ष्मीकॉलनी समोर, कुमार मिडोजजवळ, शेवाळवाडी फाटा, पीएमपी डेपो परिसर, कुदळे कार परिसर, भापकरमळा रोड चौक, मांजरी फार्म व चौक आदी ठिकाणी मोठ्या आकाराची धोकादायक होर्डिंग आहेत. तसेच सासवड-तुकाईदर्शन चौक, गंगानगर चौक, बसडेपो परिसर, फुरसुंगी-उरुळी टेक्सटाईल्स मार्केट परिसर, उरुळी देवाची फाटा, वडकी फाटा, दहावा मैल, दिवे घाट पायथा आदी ठिकाणची परिस्थिती देखील वेगळी नाही.

हडपसर परिसरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे. उर्वरित होर्डिंगवर देखील लवकरच कारवाई करण्यात येईल.

– भारत गायकवाड, आकाशचिन्ह विभाग, हडपसर क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news