नवी सांगवी : लोंबकळणार्‍या फांद्यांमुळे अपघाताची भीती

नवी सांगवी : लोंबकळणार्‍या फांद्यांमुळे अपघाताची भीती

नवी सांगवी(पुणे) : सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अनेक झाडे धोकादायक असून, त्याच्या फांद्या लोंबकळत असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. झाडांच्या फांद्यांचा भार वाढल्यामुळे झाडे उन्मळून पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे झाडांच्या धोकादायक फांद्या लवकरात लवकर तोडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

उद्यान विभागाचे दुर्लक्ष

पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकाकडून साठ फुटी रोडच्या दिशेने जाताना रस्त्याच्या दुतर्फा बाजूस पावसाळ्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील झाडांच्या फांद्या अक्षरशः लोंबकळत आहेत. झाडांच्या फांद्यांची वाढ झाल्याने तसेच झाडांचा भार वाढल्यामुळे काही झाडे उन्मळून पडण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे उद्यान विभाग झाडे लावा झाडे जगवा यासाठी जनजागृती करीत असते. मात्र, झाडे मोठी झाल्यावर त्या झाडांची निगा राखण्यासाठी उद्यान विभाग दुर्लक्ष करीत आहे.

वाहनांचे नुकसान

गेल्या महिन्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे सांगवी, पिंपळे गुरव परिसरात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडून आल्या होत्या. या वेळी काही वाहनांवर झाडे पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या, झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतुकीसाठी ठप्प झाले होते. या वेळी आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत रस्ते सुरळीत करून देणे, वाहनांवर उन्मळून पडलेली झाडे सुरक्षितपणे फांद्या छाटून मोकळीक करून देण्यात आली.

धोकादायक फांद्या तोडण्याची मागणी

येथील साठ फुटी रोडवरील झाडांच्या फांद्या लोंबकळत असल्याने पदपथावरून पायी चालणार्‍या नागरिकांच्या डोक्याला या फांद्या लागत आहेत. दुतर्फा बाजूस रस्त्याच्याकडेला पदपथाला लागून वाहने पार्क करताना लोंबकळणार्‍या फांद्यांचा अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित येथील रस्त्याच्याकडेला दुतर्फा बाजूस असणार्‍या झाडांच्या फांद्या कट करून झाडांवरील वाढलेला भार कमी करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

फांद्या उचलण्यास टाळाटाळ

महापालिकेच्या उद्यान विभागाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळेच अशा घटना घडून येत आहेत. येथील रस्त्यावरदेखील काही महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे फांद्या पडल्या होत्या. तर, काही झाडे उन्मळून पडली होती. या वेळी वाहने घसरून अपघातही घडून आले होते. उद्यान तसेच आरोग्य विभागाकडून येथील रस्त्यावर पडलेला पालापाचोळा, फांद्या उचलण्यास तीन ते चार दिवस लागले होते. याचा नाहक त्रास वाहतुकीला तसेच पायी चालणार्‍या नागरिकांना होत होता.

उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे पावसाळ्यात येथील परिसरातील झाडे उन्मळून पडण्याची दाट शक्यता आहे. एखादे झाड, फांदी वाहनांवर पडून नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे. त्यामुळे त्वरित झाडांच्या फांद्या उद्यान विभागाकडून छाटण्यात यावीत.

– शिवाजी कदम, स्थानिक नागरिक

येथील रस्त्यावर वर्दळ असते. शाळा, गॅस गोडाऊन, कार्यालये असल्याने नागरिक, विद्यार्थी रस्त्यावरून ये-जा करीत असतात. लोंबकळणारी एखादी जरी फांदी पायी अथवा वाहनचालकाच्या अंगावर पडल्यास अपघात घडून जीव जाऊ शकतो. याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष न करता दखल घ्यावी.

– महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते

पावसाळ्यापूर्वी फांद्या छाटण्यात आल्या होत्या. मात्र, पावसाळ्यात झाडांच्या फांद्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी फांद्या छाटण्याची कामे सुरू आहेत. याबाबत नुकतीच माहिती मिळाली आहे. संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली जाईल.

– रविकिरण घोडके, उपायुक्त उद्यान

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news