

Dagdusheth Ganpati 2026: पुण्याचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गणेशोत्सवाला आज, सोमवार १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरुवात होत आहे. यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार असून, उत्सवाचे हे १३४ वे वर्ष आहे. दरवर्षी देशातील प्रसिद्ध मंदिरे आणि राजवाड्यांच्या प्रतिकृती साकारण्याची परंपरा मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. यंदा उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील प्रसिद्ध ‘प्रेम मंदिरा’ची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
प्रेम, भक्ती आणि सौहार्दाचे प्रतीक असलेल्या या मंदिराची आकर्षक सजावट आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे. देखाव्याच्या मध्यभागी बाप्पांचा आकर्षक मखर असून, त्याच्या दोन्ही बाजूंना भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मनमोहक मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मंदिरापासून निघणार आहे. फुलांनी सजवलेल्या भव्य रथातून बाप्पांचे आगमन होणार आहे.
यानंतर सकाळी ११.११ वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या शुभहस्ते हा धार्मिक विधी पार पडणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवातील ‘प्रेम मंदिर, वृंदावन’ या देखाव्याचे आणि विद्युत रोषणाईचे उद्घाटन सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
देशातील विविध राज्यांच्या संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाची ओळख भाविकांना व्हावी, तसेच विविध भागांतील नागरिकांमध्ये भावनिक नाते निर्माण व्हावे, हा या सजावटीमागील उद्देश असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २४ सप्टेंबरदरम्यान दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्रींचे अभिषेक आणि महापूजा होणार आहेत.
१४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता गणेशयागाला सुरुवात होईल. १५ ते १८ सप्टेंबरदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी १ ते ५ या वेळेत गणेशयागाचे विविध धार्मिक विधी पार पडतील.
ऋषिपंचमीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषाताई दीपक नागपुरे तसेच विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता सामूहिक सूर्यनमस्कार, तर १७ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता एकादशीनिमित्त मंत्रजागर होणार आहे.
गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. ‘श्री वक्रतुंड’ रथातून श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना बाप्पाचे दर्शन घेण्यासोबतच वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती, आकर्षक विद्युत रोषणाई आणि राधा-कृष्णाच्या मनमोहक मूर्तींचा देखावा अनुभवता येणार आहे.