पुणे : पुढारी वृत्तसेवा : सायबर पोलिस ठाण्यात लवकरच आता ई-ऑफिसप्रमाणे कामकाज राबविण्यात येणार आहे. दाखल होणार्या तक्रारींच्या वर्गीकरणापासून ते निपटारा करण्यासाठी एक कार्यपद्धती तयार करण्यात येणार आहे. कोणत्या तपास अधिकार्याकडे किती गुन्हे तपासासाठी आहेत, त्यांनी किती दिवसांत त्या गुन्ह्यांचा तपास करणे अपेक्षित आहे. अशा बाबींचा त्यामध्ये समावेश असणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एका क्लिकवर पोलिस आयुक्तांपासून ते उपायुक्तांपर्यंत सर्वांना ही माहिती दिसणार आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार असल्याचे दिसून येते.
दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचा विळखा वाढतोय. नागरिक प्रलोभनाला बळी पडून अलगद सायबर ठगांच्या जाळ्यात अडकून लाखो रुपये त्यांच्या हवाली करत आहेत. शेअर मार्केट, पार्ट टाईम नोकरी, टास्क फ्रॉड, फेडेक्स कुरिअर मुंबई नार्केटीक्स क्राईम ब—ँच फंडा, केवायसी, विद्युत वितरण, मेट्रोमोनियल फ्रॉडच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक सायबर चोरटे करत आहेत. पुण्यात दाखल होणार्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींचे प्रमाण मोठे आहे. दरम्यान, सायबर पोलिस ठाण्याकडील अपुरे मनुष्यबळ, प्रशिक्षणाचा अभाव, तंत्रज्ञानाच्या अपुर्या सुविधा यामुळे तपासात पोलिसांना कामकाजात मर्यादा येत आहेत.
शिवाय नागरिकांनादेखील तक्रार कधी आणि कोठे करायची याबाबतची माहिती नसते. त्यामुळे गेलेली रक्कम परत मिळविण्यासाठी सायबर पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. एकंदर भविष्यात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात पाय पसरू पाहतेय. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सायबर पोलिस ठाण्यात आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज सायबर लॅब, सोशलमीडिया नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. सध्या शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात 38 कर्मचारी आहेत. त्यामध्ये सात पोलिस अधिकारी आहेत.
सायबर पोलिस ठाण्यातील कामकाज गतिमान व्हावे, नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच, तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी सायबर लॅब, सोशल मीडिया नियंत्रण केंद्र उभारण्यात येत आहे. दाखल होणार्या तक्रारींपासून त्यांच्या तपासापर्यंत एक कार्यपद्धती निश्चित करण्याच्या अनुषंगाने कामकाज सुरू आहे.
– शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.
सायबर पोलिस ठाणे आणि पोलिस ठाण्यातील सायबर गुन्ह्यांच्या तपासात मदतीच्या दृष्टिकोनातून 25 ते 30 सायबर तज्ज्ञांचा समावेश असलेले पॅनल लवकरच तयार करण्यात येणार आहे.
तक्रारदाराला सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर टोकन आयडी मिळणार आहे. त्या टोकन आयडीच्या माध्यमातून तक्रारदाराच्या तक्रारीचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे तक्रारदाराला नेमकी तक्रार काय आणि कोठे करायची हे समजणार आहे. त्यासाठी पाच डेस्क दोन सत्रात काम करणार आहेत. कमी वेळात तक्रार दाखल होण्याच्या दृष्टिकोनातूनदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेकदा सायबर गुन्ह्याच्या बाबतीत जबाब कसा नोंदवायचा यात प्रशिक्षणाच्या अभावामुळे अडचणी येतात.
त्यामुळे तेथे काम करणार्या दहा ते बारा कर्मचार्यांना सॉफ्ट स्किल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे सर्वजण जबाब नोंदविण्याचे काम करणार आहेत. तक्रारींचा निपटारा किती दिवसात व्हावा, याबातची नियमावली काय असावी याबाबतसुद्धा काम करण्यात येणार असून, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. हे सर्व कामकाज पोलिस आयुक्तांपासून ते उपायुक्तापर्यंत सर्वांना एका क्लिकवर दिसणार असून, वेळोवेळी त्यांना आढावा घेता येणार आहे.
सायबर पोलिस ठाण्याला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळावे म्हणून दीडशे अधिकारी, कर्मचार्यांची बेंचमार्क चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पोलिस ठाणे आणि सायबर पोलिस ठाण्यातील पोलिसांचा समावेश असणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून तपासाच्या बाबतीत कोणत्या प्रकारचे कौशल्य अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये आहे हे तपासले जाणार आहे. त्यानंतर निवड करण्यात आलेल्यांना सायबरचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हेही वाचा