‘क्लिपर’च्या माध्यमातून ‘नासा’ शोधणार गुरूच्या चंद्रावरील जीवसृष्टी

‘क्लिपर’च्या माध्यमातून ‘नासा’ शोधणार गुरूच्या चंद्रावरील जीवसृष्टी

वॉशिंग्टन : अंतराळाच्या या अनंत विस्तारात केवळ पृथ्वी नामक छोट्याशा ग्रहावरच जीवसृष्टी आहे असे म्हणणे हे खरे तर 'कूपमंडूक' वृत्तीचे लक्षण आहे. विहिरीतील बेडकाला विहीर म्हणजेच अख्खे जग वाटत असते आणि समुद्रातून आलेल्या बेडकाने समुद्राचे केलेले वर्णन त्याला खोटे वाटते. अशी संकुचित वृत्ती ठेवणे चुकीचे आहे हे समजून गेल्या अनेक वर्षांपासून खगोलशास्त्रज्ञ अन्य ग्रह किंवा त्यांच्या चंद्रांवर सुक्ष्म जीवांच्या स्वरुपात का होईना जीवसृष्टीचे अस्तित्व आहे का, हे शोधत आहेत. या शोधकार्यात गुरूचा चंद्र 'युरोपा' सातत्याने लक्ष वेधून घेत असतो. या बर्फाळ चंद्रावरील जीवसृष्टीची शक्यता शोधण्यासाठी आता 'नासा' ऑक्टोबरमध्ये 'क्लिपर' हे यान लाँच करणार आहे.

आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. निव्वळ वायूचा गोळा असलेल्या या ग्रहाला नव्वदपेक्षाही अधिक चंद्र आहेत. त्यापैकी 'युरोपा' हा चंद्र बर्फाळ पाण्याने आच्छादलेला असल्याने त्याकडे संशोधकांचे लक्ष अधिक जात असते. मिशनचे प्रोजेक्ट सायंटिस्ट बॉब पप्पलार्डो यांनी सांगितले की, 'नासा' काही मुलभूत प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. त्यापैकी एक म्हणजे 'ब्रह्मांडात आपण एकटेच आहोत का?' हा प्रश्न. जर 'युरोपा'वर जीवसृष्टीचे अस्तित्व आढळले तर किमान असे म्हणता येईल की, आपल्या सौरमालिकेत पृथ्वी आणि युरोपावर जीवसृष्टी आहे. त्याचा शोध घेण्यासाठी 5 अब्ज डॉलर्स खर्च करून तयार केलेले 'क्लिपर' प्रोब पाठवले जाणार आहे.

हे प्रोब सध्या कॅलिफोर्नियातील 'नासा'च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याला एका 'क्लीन रूम'मध्ये ठेवले आहे व संपूर्ण परिसर सील केलेला आहे. डोक्यापासून पायापर्यंत स्वतःला झाकून घेतलल्या लोकांनाच त्याच्याजवळ जाण्याची परवानगी आहे. इतकी सावधगिरी बाळगण्याचे कारण म्हणजे कोणत्याही प्रकारे हे यान संक्रमणापासून सुरक्षित राहील. ही काळजी घेतली नाही तर पृथ्वीवरील सुक्ष्म जीव या यानाच्या माध्यमातून युरोपापर्यंत पोहोचू शकतात. हे यान फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून लाँच केले जाईल.

त्यासाठी 'स्पेसएक्स'च्या फाल्कन हेवी रॉकेटचा वापर करण्यात येईल. त्यानंतर हे यान पाच वर्षांचा आपला प्रवास सुरू करील. वाटेत मंगळग्रहाजवळ ते आपला वेग वाढवेल. हे यान 2031 पर्यंत गुरू आणि युरोपाच्या कक्षेत जाऊन पोहोचेल, अशी संशोधकांना आशा आहे. या यानावर कॅमेरा, स्पेक्ट्रोमीटर्स, मॅग्नेटोमीटर आणि रडारसारखी उपकरणे आहेत. हे यान बर्फात उतरू शकते, पाण्यावर तरंगू शकते आणि पाण्याच्या खालून पुन्हा पृष्ठभागावर येऊन बर्फाचा स्तर किती जाडीचा आहे, हे सांगू शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news