न्यूयॉर्क : मोटारीच्या आकाराचा एक लघुग्रह 11 एप्रिल रोजी पृथ्वीच्या अतिशय जवळून पुढे निघून गेल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या लघुग्रहाचा आकार अंदाजेे 9.4 फुटांचा होता. हा लघुग्रह बराच जवळ आला असला तरी पृथ्वीला कोणतीही हानी न पोहोचवता पुढे गेला.
या लघुग्रहाचे नाव '2024 जीजे 2' असे आहे. तो पृथ्वीपासून अवघ्या 19.3 हजार किलोमीटर अंतरावरून गेला. चंद्र आणि पृथ्वीदरम्यानच्या अंतराचे हे तीन टक्के अंतर आहे.
युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या (ईएसए) माहितीनुसार, या लघुग्रहाची लांबी 2.5 ते 5 मीटर (8.2 ते 16 फूट) इतकी आहे. गुरुवारी म्हणजे 11 एप्रिलच्या दुपारी तो पृथ्वीपासूनच्या सर्वात निकटच्या अंतरावर आला होता. त्यावेळी तो पृथ्वीपासून 12,298 किलोमीटरवर होता. आता हा लघुग्रह 2093 पर्यंत पृथ्वीच्या जवळ येणार नाही. अर्थात त्यावेळी तो सध्याइतक्या जवळून जाणार नाही. 'नासा'ने आतापर्यंत सुमारे 35 हजार निकट-पृथ्वी (निअर अर्थ अस्टेरॉईड्स) लघुग्रहांची नोंद केलेली आहे.
अंतराळात अशा अवकाशीय शिळा अनेक फिरत असतात. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान तर अशा लघुग्रहांचा एक पट्टाच असून, त्याचे नाव 'अॅस्टेरॉईड बेल्ट' असे आहे. आपल्या सौरमालिकेच्या टोकाशी म्हणजे नेपच्यूनच्या पलिकडे असे लघुग्रह आहेत. एका लघुग्रहाच्या धडकेनेच पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य नष्ट झाले होते. या धडकेची खूण आजही मेक्सिकोतील चिक्सलब क्रेटरच्या रूपाने पाहायला मिळते.