Cyber Fraud : टास्कचा फंडा वापरुन चौघांना 44 लाखांचा गंडा

Cyber Fraud : टास्कचा फंडा वापरुन चौघांना 44 लाखांचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने शहरात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरट्यांनी चौघांची 43 लाख 69 हजार 966 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, चतुःशृंगी, चंदननगर, लोणीकंद आणि मुंढवा पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगरमधील 54 वर्षीय व्यक्तीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फरिदा लैला अलेक्झांडर नावाच्या महिलेसह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. फिर्यादींच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता.

समाजमाध्यमातील ध्वनिचित्रफित, जाहिरातीला दर्शक पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, घरातून काम करण्याची संधी, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी तक्रारदाराला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर ऑनलाइन टास्कमध्ये आणखी रक्कम गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 11 लाख 92 हजार 385 रुपये उकळले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे तपास करत आहेत.

सायबर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कच्या आमिषाने खराडी भागातील एका तरुणाची 20 लाख सात हजार 420 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तरुणाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित रेजीतवाड तपास करत आहेत. तसेच, वाघोली परिसरातील एका तरुणाची आठ लाख आठ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून वेगवेगळे पेड टास्क देऊन तरुणाकडून सायबर चोट्यांनी हे पैसे लुबाडले आहेत. तर, घोरपडी-मुंढवा येथे तरुणीची पार्ट टाईम नोकरीचे प्रलोभन दाखवून पेड टास्कच्या बहाण्याने तिच्याकडून सायबर चोरट्यांनी 3 लाख 61 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी 29 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news