Cyber Crime : व्यावसायिकाला तब्बल एक कोटीचा गंडा

Child pornography
Child pornography

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एक कोटी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला आहे. व्यावसायिकाने आपले पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली तर केलेच; शिवाय बहिणीचे देखील पैसे दिले. याप्रकरणी भवानी पेठेतील 55 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर ठगांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे व्यावसायिक आहेत.

सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क केला. फिर्यादींनी त्यांच्यावर विश्वास ठेवत काही पैसे गुंतवणूक केले. फिर्यादींनी त्यांचे बँक खाते आणि बहिणीच्या बँक खात्यावरून तब्बल एक कोटी 20 लाख रुपये पाठवून दिले. काही दिवसांनंतर ना गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळत आहे ना नफा, हे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे फिर्यादींना समजले. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

सायबर ठगांकडून एकाला 14 लाखांचा गंडा

अशाच प्रकारे एका व्यक्तीला सायबर ठगांनी 14 लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना सहकारनगरमधील पाटीलनगर येथे घडली आहे. याप्रकरणी 51 वर्षीय व्यक्तीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफ्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात अडकविले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेत, त्यांना नफा कसा मिळतो, ते दाखविण्यात आले. त्यानंतर विश्वास संपादित केल्यानंतर 13 लाख 58 हजार रुपये वर्ग करून घेत परतावा न देता सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे तपास करीत आहेत.

टास्क फ्रॉडद्वारे सव्वाचार लाखांची फसवणूक

पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून सायबर ठगांनी एका तरुणीला टास्क फ्रॉडद्वारे 4 लाख 33 हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी बाणेरमधील 29 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार चतुःशृंगी पोलिसांनी सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जादा कमाईचे प्रलोभन दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे.

जुन्या नोटांच्या नादात साडेसात लाख गमावले

जुन्या नोटांतून नफा कमविण्याच्या नादात एका महिलेला सात लाख 41 हजार रुपये गमविण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी हिंगणेमळा हडपसरमधील 37 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेशी संपर्क केला. तिला जुन्या नोटांच्या विक्रीतून चांगला नफा मिळविता येतो, असे प्रलोभन दाखविले. त्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी सात लाख 41 हजार रुपये उकळले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news