वरंध घाट पुन्हा एकदा बंद; 30 मेपर्यंत वाहतुकीस मज्जाव! | पुढारी

वरंध घाट पुन्हा एकदा बंद; 30 मेपर्यंत वाहतुकीस मज्जाव!

भोर : पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून भोरमार्गे कोकणातील महाडला जाणार्‍या वरंध घाटातील सर्व प्रकारची वाहतूक पुन्हा एकदा 30 मेपर्यंत बंद करण्यात आली आहे. घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे घाटातील वाहतूक बंद केल्याची माहिती संबंधित विभागांकडून देण्यात आली आहे. घाटरस्ता दुरुस्तीच्या कामासाठी दि. 1 एप्रिल ते 30 मेपर्यंत वरंध घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र लग्नसराई, उन्हाळ्याची सुटी, लोकसभा निवडणुकीमुळे कोकणात ये-जा करण्यासाठी दि. 1 ते 8 मेपर्यंत वरंध घाट प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

दरम्यान घाटरस्त्याचे दुपदरीकरण, संरक्षक भिंत बांधणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची कामे सुरू आहेत. मात्र या कामात वाहतुकीमुळे अडचणी येत आहेत. तसेच अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव अखेर घाट पुन्हा गुरुवार, दि. 16 मेपासून 30 मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या घाटरस्त्यावर मोठ-मोठे दगड टाकून वाहतूक बंद केली आहे. प्रवाशांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सूचनाफलकांअभावी वाहनचालकांना हेलपाटे

वरंध घाट बंद असल्याचे भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनही भोर-महाड मार्गावर सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे अनेक वाहनचालक नेहमीप्रमाणे वरंध घाटात जात आहेत आणि घाट बंद पाहून परत भोरला येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आणि वाहनाचे इंधनही वाया जात आहे.

हेही वाचा

Back to top button