Market Update News: पुरंदर तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या सीताफळाचा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने बाजारात अत्यल्प दर मिळाला. याचा फटका सीताफळ उत्पादकांसह व्यापार्यांना देखील बसला. एकंदरीत यावर्षी सीताफळ हंगाम तोट्यात गेल्याचे शेतकर्यांचे तसेच व्यापार्यांचे म्हणणे आहे.
येथील शेतकर्यांचे अर्थकारण हे सीताफळावर अवलंबून असते. मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने उन्हाळी हंगामात कमी शेतकर्यांना उत्पादन घेता आले. बहुतांश शेतकर्यांनी पावसावरच बहराचे नियोजन केले. सुरुवातीच्या काळात बाजारात मालाची आवक कमी होत होती. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळत होता. परंतु मागील दोन महिने बाजारात मालाची प्रचंड आवक होत गेली आणि त्यामुळे शेतकर्यांना अत्यल्प बाजारभाव मिळाला आहे.
वाहतूक खर्चात वारंवार होणारी वाढ तसेच स्थानिक बाजारात कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, सर्व मालाची रोख स्वरूपात विक्री होते. त्यामुळे येथील शेतकरी स्थानिक सासवड, दिवे, गुर्होळी या बाजारपेठेतच आपला माल विकतात. राज्यभरात सध्या सीताफळाची लागवड वाढत आहे. पुरंदर तालुक्यात तर खूप मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे बाजारात मालाची प्रचंड आवक होत आहे. या हंगामाचा विचार केल्यास अक्षरशः मातीमोल भावाने आपला माल शेतकर्यांना विकावा लागला आहे.
सध्या हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 22) बाजारात तीन हजारांच्या आसपास क्रेट सीताफळ आवक झाल्याचे सुशिल झेंडे, अक्षय कामठे, नितीन काळे, शंकर झेंडे या व्यापार्यांनी सांगितले. प्रतवारिनुसार 500 ते 3 हजार रुपये प्रती क्रेट बाजारभाव मिळाला. परंतु हंगामाचा विचार केला तर यावर्षी सीताफळ उत्पादक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे काही व्यापारी बाहेरील राज्यात माल पाठवतात, तर काही व्यापार्यांनी हंगामाच्या सुरवातीलाच थेट बांधावर जाऊन बागा खरेदी केल्या होत्या. त्यांना फार मोठा आर्थिक फटका बसला, अशी माहिती व्यापारी सौरभ झेंडे यांनी दिली.
पेरूला मिळतोय मातीमोल भाव
सध्या बाजारामध्ये पेरूचा दर नीचांकी पातळीवर म्हणजे प्रतिकिलोस रुपये 10 ते 12 एवढा खाली घसरला आहे. त्यामुळे पेरू उत्पादक शेतकर्यांना सध्या मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. बाजारामधील वाढलेली आवक व परराज्यातून पावसामुळे कमी झालेली मागणी, यामुळे पेरूच्या दरात सध्या प्रचंड घसरण झाली आहे.
पुणे, मुंबई बाजार समितीमधून अडते तर शेतकर्यांना पेरू आणू नका, असे सांगत आहेत. कारण, शेतकर्यांना वाहतूकखर्च प्रतिकिलोस सुमारे रुपये 4 ते 5 येत आहे. त्यामुळे शेतकर्यास प्रतिकिलोस फक्त रुपये 5 ते 6 एवढी अल्प रक्कम शिल्लक राहत आहे. त्यामुळे शेतकर्याचा काढणी व फोमचा खर्चही निघत नाही, अशी विदारक परिस्थिती सध्या शेतकर्यांची झाली आहे.
उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी सध्या तोट्यात गेला आहे. उन्हाळ्यामध्ये पेरूचे दर उच्चांकी पातळीवर म्हणजे प्रतिकिलोस रुपये 125 पर्यंत वधारले होते. दरम्यान, इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या पाच-सात वर्षांपासून पेरू पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मात्र, पेरूच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.