Maharashtra Assembly Election | आपापल्या बंडखोरांना आवरा; अमित शहा

नांदगावात समीर भुजबळ, ठाण्यात संजय भोईर, भिवंडी ग्रामीण स्नेहा पाटील, तर जालनामध्ये भास्कर दानवे यांची अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी
Amit Shah
केंद्रीय गृहमंत्री अमित शहाFile Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महायुतीतील तिन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्याविरोधात नाराजांनी राज्यभरात बंडाचे निशाण फडकावले आहे. यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील बंडखोरांची संख्या अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची शिवसेनेच्या शिंदे गटाचे नांदगावमधील अधिकृत उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधातील खदखद उघड झाली आहे. (Assembly Election)

समीर यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ठाणे शहर मतदारसंघात भाजपाने विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी दिली आहे. या विरोधात संतापलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक, ठाणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती संजय भोईर यांनी दंड थोपटले आहेत. याशिवाय भाजपाचे माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनीही केळकर यांना आव्हान दिले आहे.

कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गटातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उघडपणे बंडाचा इशारा दिला होता. उल्हासनगरमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण तेथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भरत राजवानी यांनीही घोडे दामटले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक विशाल पावशे हेदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे हे दोन इच्छुकदेखील सुलभा गायकवाड यांच्या विरोधात निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार चंद्रशेखर कदम नाराज झाले आहेत. चंद्रशेखर कदम यांनी त्यांचा मुलगा सत्यजित कदम याच्यासाठी तिकिटाची मागणी केली होती.

सत्यजित हे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे माझे कार्यकर्ते जी भूमिका घेतील, त्यानुसार भविष्याची दिशा ठरवली जाईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

२०१९ मध्ये या मतदारसंघातून हरिभाऊ बागडे निवडून गेले होते. परंतु त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी दावा ठोकला होता. अनुराधा चव्हाण यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

फुलंब्रीमध्ये शिवसेना (शिंदे गटाचे) रमेश पवार यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. जालन्यात शिंदे गटाच्या अर्जुन खोतकर यांच्या विरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर यांनी शक्तिप्रदर्शन केले. ते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आहेत. दुचाकी रॅली काढत त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. मैत्रिपूर्ण लढतीसाठी आम्ही आग्रही असल्याची भूमिका भास्कर दानवे यांनी घेतली आहे.

बंडखोरांना आवरा : अमित शहा

आपापल्या बंडखोरांना आवरा. निष्कारण पाडापाडीचे राजकारण करू नका, अशी सूचना अमित शहा यांनी दिल्लीतील महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत केली. उमेदवारी न मिळालेले काहीजण बंडखोरी करू शकतात, अशा कार्यकर्त्यांचे मन वळवा. निष्कारण पाडापाडीचे राजकारण होऊ नये, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news