विधानसभा निवडणुकीसाठी गुरूपुष्यामृताचा मुहूर्त साधत जिल्ह्यातील विविध मतदारसंघांतील प्रमुख, आजी-माजी आमदारांनी आणि अन्य नेत्यांनीही गुरुवारी (दि. 24) आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी नीलेश लंके व प्रभावती प्रताप ढाकणे, डॉ. राजेंद्र पिपाडा व ममता राजेंद्र पिपाडा आदींचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी गुरुवारी शिर्डी मतदारसंघातून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. याच मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे डॉ. राजेंद्र पिपाडा व त्यांच्या पत्नी ममता पिपाडा यांनी अपक्ष अर्ज सादर केले.
अहमदनगर शहर मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जावर सूचक म्हणून अविनाश घुले यांचे नाव आहे.
शेवगाव मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर मृत्युंजय गर्जे यांचे सूचक म्हणून नाव आहे. याशिवाय या मतदारसंघातून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अॅड. प्रताप ढाकणे यांच्या पत्नी प्रभावती ढाकणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय दिलीप कोंडिबा खेडकर व रत्नाकर जनार्धन जावळे यांनी अपक्ष अर्ज सादर केले आहेत.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अकोले मतदारसंघातून आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. याच मतदारसंघातून पुणे जिल्ह्यातील गणेश काशिनाथ मधे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
राहुरी मतदारसंघातून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सुभाष पाटील सूचक आहेत. या मतदारसंघातून गुरुवारी नानासाहेब पंढरीनाथ जुंधरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने, आणि दीपक विठ्ठल बर्डे व इम्रान नबी देशमुख यांनी अपक्ष अर्ज दाखल केले.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या श्रीरामपूर मतदारसंघातून अशोक निवृत्ती बागूल यांनी चार अर्ज दाखल केले आहेत. दोन अर्ज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून, तर दोन अर्ज अपक्ष म्हणून दाखल केले.
कोपरगाव मतदारसंघातून संजय भास्कर काळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. संगमनेर मतदारसंघातून भागवत धोंडिबा गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे.