’कोरा’चा धांगडधिंगा आवरा; कोरेगाव पार्कमधील पबने उडवली नागरिकांची झोप

’कोरा’चा धांगडधिंगा आवरा; कोरेगाव पार्कमधील पबने उडवली नागरिकांची झोप
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील पबला घालून दिलेले नियम धाब्यावर बसविण्याचे काम सुरू असल्याचे कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणानंतर सर्वांच्या निदर्शनास आले. त्यातच कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या 'कोरा' नावाच्या पबने स्थानिक नागरिकांची झोपमोड करीत त्यांना हैराण केले आहे. या पबमध्ये रात्री सुरू असलेल्या डीजेच्या दणदणाटाबरोबरच मद्यधुंदांचा धांगडधिंगा यंत्रणांच्या कानी कसा पडत नाही? हा मोठा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍या रेस्टॉरंट, बार, पबवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे 'कोरा'च्या त्रासातून नागरिकांची सुटका होणार की नाही, हे पाहावे लागणार आहे.

कोरेगाव पार्क येथील 'कोरा' या रेस्टॉरंट पबवर सर्वाधिक कारवाई आवाजाच्या तीव्रतेबाबत करण्यात आली आहे. बर्‍याच वेळा साउंड सिस्टिमही जप्त केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी उत्पादन शुल्क जिल्हाधिकार्‍यांना सादर केला होता. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले, हे समजू शकले नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने किंवा स्थानिक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही. केवळ थातुरमाथुर कारवाईवर तक्रारदारांची बोळवण करण्यात आली. कल्याणीनगर येथे दोन आयटी अभियंता तरुण-तरुणीच्या अपघाती मृत्यूनंतर शहरातील पबसंस्कृतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मोठ्या आवाजात गाणी लावण्यात येत असल्यामुळे रात्रीच्या वेळीचा कर्णकर्कश आवाज डोकेदुखी ठरत आहे. या परिसरात वास्तव्यास असलेल्या तरुणवर्गात आता कर्णबधिरतेचे प्रमाण वाढत असल्याचाही येथील नागरिकांकडून दावा केला जात आहे. न्यायालयाच्या आदेशाने ध्वनिप्रदूषणावरील निर्बंध कडक करण्यात आले असले तरी पब, आलिशान हॉटेल, बार येथील बंदिस्त दालनांत डीजेचा दणदणाट सुरूच आहे. याचा सर्वाधिक त्रास या परिसरातील रहिवाशांना होत आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून घर खरेदी करून या ठिकाणी राहण्यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील रहिवासी अन्य ठिकाणी घरे शोधू लागले आहेत. सर्वसामान्य व्यक्ती 70 डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकते. मात्र, पबमध्ये आवाजाची पातळी सामान्य आवाजापेक्षा अधिकपटीने वाढलेली असते. त्यामुळे कानाच्या समस्या उद्भवत आहेत. खरेतर कोरेगाव पार्क परिसर हा शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी विदेशी नागरिकांचा देखील मोठा राबता असतो. अनेक व्यावसायिकांनी येथील परिसरात पब, हॉटेल, गार्डन रेस्टॉरंट सुरू केली आहेत.

जसजसा दिवस मावळायला सुरुवात होते, तशी या ठिकाणची रात्र अधिक रंगतदार होते. मग कानावर पडू लागतो कर्णकर्कश गाण्यांचा आवाज. खरेतर न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहानंतर, उघड्या जागेत तसेच बंदिस्त जागेतही मोठ्या आवाजात साउंड सिस्टिम लावण्यास बंदी आहे. रात्री हॉटेल किती वाजेपर्यंत सुरू ठेवायचे, याचे देखील काही नियम आहेत. मात्र, कोरेगाव पार्क पोलिस लक्ष्मीदर्शनाच्या नादात नियमांना हरताळ फासत असल्याचे दिसून येते.

वाहतूक कोंडीचाही सामना

दुसरीकडे, येथील पबमुळे परिसरात रात्री मोठी वाहतूक कोंडी होते. लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागतात. तसेच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येते. रात्री जबरी चोरी, लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. 'कोरा'च्या तक्रारीनंतर पोलिसांनी खटले भरणे, साउंड सिस्टिम जप्त करण्याची कारवाई केली. तसेच परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागाला पाठविला आहे. असे असताना देखील 'कोरा'च्या वर्तनात सुधारणा होताना दिसून येत नाही. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्था

निकांवर घर विकण्याची वेळ

पब, हॉटेलमधील डीजे कोरेगाव पार्कमधील नागरिकांच्या मुळावर उठले आहेत. येथील पब, रेस्टॉरंट, बार, नियमांची ऐशीतैशी करीत रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मात्र, या आवाजाचा त्रास आता दररोज सहन होत नसल्यामुळे येथील नागरिकांवर 'कोणी घर विकत घेता का घर…' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news