

सुवर्णा चव्हाण :
पुणे : पुण्यात सेलिब्रिटींच्या म्युझिक कॉन्सर्ट होतात, त्याप्रमाणेच आता नामवंत डिस्क जॉकी (डीजे) पुण्यात येऊन सादरीकरण करीत असून, त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या संगीताने तरुणाईला वेड लावले आहे. त्यामुळेच पुण्यात होणार्या डीजे कॉन्सर्टचीही संख्या वाढली आहे.
डीजे कॉन्सर्टमध्ये खास रिमिक्स गीते डीजे आपल्या म्युझिक सिस्टिमवर वाजवत आहेत आणि तरुणांची मने जिंकत आहेत. डीजे नाइट, बॉलिवूड नाइट अशा वेगवेगळ्या थीमवर कॉन्सर्ट होत असून, पुण्यातील विविध पब, रेस्टॉरंटसह पार्टीज, म्युझिक कॉन्सर्टमध्ये डीजेंच्या संगीतावर तरुणाई थिरकताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे हिंदी, इंग्रजीसह मराठी रिमिक्स गीतेही कॉन्सर्टमध्ये वाजविली जात आहेत.
कानात हेडफोन, खास म्युझिक सिस्टिमद्वारे विविध रिमिक्स गीते वाजविणे आणि त्याच तालावर स्वत: ठेका धरत इतरांनाही संगीताच्या तालावर थिरकविणारे कलाकार म्हणजेच डिस्क जॉकी (डीजे). सध्या डीजे म्हणून काम करणार्या तरुण-तरुणींचीही संख्या वाढत असून, कोरेगाव पार्क, हिंजवडी, विमाननगर, कॅम्प, बाणेर, बावधन, खराडी आदी ठिकाणी अशा कॉन्सर्ट होत आहेत.
डीजे शब्बीर आकिवाटे म्हणाले, 'आज डीजे क्षेत्रात करिअर करणार्या 20 ते 35 वयोगटातील तरुण-तरुणींची संख्या वाढत असून, डीजेचे प्रशिक्षण घेऊन ते या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. मी गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत असून, सध्या डीजे कॉन्सर्टचीही संख्या वाढत आहे. पुण्यासह ठिकठिकाणी मी कार्यक्रमांसाठी जात असून, कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.'
गेल्या काही दिवसांत डीजे संस्कृती वाढत चालली असून, अनेक नामवंत डीजे पुण्यात येऊन कॉन्सर्ट करीत आहेत. मुंबईसह आता पुण्यातही कॉन्सर्टची संख्या वाढली असून, त्याशिवाय पब, रेस्टॉरंटसह विविध कार्यक्रम, लग्नसमारंभ, पार्टी, वाढदिवसांच्या कार्यक्रमांतही डीजे सादरीकरण करीत आहेत. तरुणांसह या क्षेत्रात तरुणींचीही संख्या वाढत असून, खासकरून डीजे कॉन्सर्टला तरुण-तरुणींची गर्दी होत आहे. मीही विविध ठिकाणी सादरीकरण करीत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– श्रेया प्रतीक देशमुख, डीजे
हे ही वाचा :