

पुणे: राज्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील 10 लाख 56 हजार 897 हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, बहुतांश खरीप पिकांच्या उत्पादनास फटका बसण्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून वर्तविण्यात येत आहे. नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान पोहोचल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.
पिकांच्या नुकसानीमध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भात, नाचणी, ज्वारी, मका, कांदा, भाजीपाला, हळद, आले, मिरची, फळपिके, केळी, आंबा, लिंबू आणि उसाचेही नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केले आहे. (Latest Pune News)
जिल्हानिहाय पिकांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राचा आकडा पुढीलप्रमाणे (हेक्टर):
सोलापूर 47266, अहिल्यानगर 72, सांगली 4972, सातारा 34, कोल्हापूर 9379, नाशिक 4239, धुळे 23, रत्नागिरी 101, रायगड 26, सिंधुदुर्ग 4, जळगांव 14,718, नंदुरबार 234, नांदेड 28,5543, हिंगोली 40,000, परभणी 20,225, छत्रपती संभाजीनगर 2074, जालना 5178, बीड 29,136, धाराशीव 1,50,516, लातूर 10, बुलढाणा 89,778, अमरावती 33,329, वाशीम 1,51,290, यवतमाळ 1,18,359, अकोला 43,703, नागपूर 1100, चंद्रपूर 4324, वर्धा 776, गडचिरोली 488 हेक्टरवरील पिकांना सततच्या पावसामुळे फटका बसला आहे.
सततच्या पावसामुळे खरिपातील काढणीस आलेल्या मूग आणि उडदाच्या पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तसेच मागील दोन दिवसांत काही ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने पिकांची हानी वाढली आहे. शासनाच्या ‘क्रॉपसॅप’ योजनेनुसार नुकसानीची माहिती प्राप्त होत आहे. त्या पिकांवरील कीड रोग नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठांनी सुचविलेल्या उपायोजनांबाबतचे सल्ले शेतकर्यांना तत्काळ देण्यात येत आहे.
- रफिक नाईकवाडी, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय,पुणे.