

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून या प्रवेश प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहणार्या विद्यार्थ्यांना आता या प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविता येणार असून, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एमबीबीएस, बीडीएसची पहिली फेरी पूर्ण झाल्याने इतर पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेरीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर सीईटी सेलने बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी) व बीयूएमएस (युनानी) या पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेर्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. (Latest Pune News)
नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिनच्या (एनसीआयसीएम) निर्देशानुसार आणि राज्य सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी) व बीयूएमएस (युनानी) या पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी (ग्रुप बी) ऑनलाइन नोंदणी, नोंदणी फी आणि मूळ कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करण्याची मुदत 1 ते 4 सप्टेंबर (सकाळी 11.59 पर्यंत) देण्यातआली आहे.
नोंदणीकृत विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी 6 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, पहिल्या फेरीसाठी सीट मॅट्रिक्स 8 सप्टेंबर रोजी जाहीर होईल. पसंतीक्रम भरण्याची मुदत 8 ते 10 सप्टेंबर (संध्याकाळी सहापर्यंत) राहील. तसेच निवड यादी 12 सप्टेंबर रोजी जाहीर होईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना 13 ते 17 सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश निश्चित करता येणार आहे.
दुसर्या फेरीसाठी सीट मॅट्रिक्स 27 सप्टेंबरला प्रसिद्ध होईल, तर पसंतीक्रम भरण्याची मुदत 29 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत राहील. निवड यादी 4 ऑक्टोबरला जाहीर होईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना 5 ते 10 ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रे व शुल्क जमा करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.