बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती एसटी बसस्थानकावर दिवाळीपासून सुरू असलेले चोर्यांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. शहर पोलिस ठाण्यात या विषयी गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. परिणामी बारामती बसस्थानकावरून प्रवास करताना मौल्यवान वस्तू, रोकड बाळगणे आता जिकिरीचे झाले आहे. गुरुवारी (दि. 14) आणखी एका ज्येष्ठ प्रवासी महिलेकडील दागिने, मोबाईल व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात उषा शिवाजी धुमाळ (वय 64, रा. सांगवी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली. त्या गुरुवारी (दि. 14) दौंड येथे मुलाकडे निघाल्या होत्या. सकाळी दहा वाजता त्या बारामती बसस्थानकावर पोहोचल्या. दौंडला जाणारी बस थांबते तेथे प्रचंड गर्दी होती. थोड्या वेळाने बस आली. गर्दीतून वाट काढत त्यांनी बसमध्ये जागा मिळविली. त्यांच्या पतीने बसच्या बाहेर उभे राहून त्यांना तिकिटासाठी सुट्टे पैसे दिले. ते पैसे पिशवीत ठेवण्यासाठी त्यांनी पिशवी उघडली असता, त्यात मंगळसूत्र, मोबाईल व रोख रक्कम दिसली नाही. त्यांनी तत्काळ पतीला ही माहिती दिली. बसमधून खाली उतरत आजूबाजूला चौकशी केली. परंतु, चोरटा सापडला नाही.
या घटनेत त्यांच्याकडील 2 तोळ्यांचे मंगळसूत्र, तीन हजार रुपयांचा मोबाईल व 500 रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली.
बारामती बसस्थानक सध्या तात्पुरत्या स्वरूपात कसब्यात आहे. या ठिकाणी अनेक अडचणींचा प्रवाशांना सामना करावा लागतो आहे. गेल्या महिन्याभरात येथे महिला प्रवाशांकडील दागिने चोरीला जाण्याची ही चौथी घटना आहे. आपत्कालीन स्थितीत पोलिस मदत कक्षही येथे नाही. कक्षाची पाटी लावलेली असली तरी तेथे कोणताही पोलिस कर्मचारी कार्यरत नसतो. परिणामी, या बसस्थानकावरून प्रवास करणे आता 'रामभरोसे' झाले आहे.
हेही वाचा