पेरूमध्ये आढळले चक्क ‘देवाचे डोळे’! | पुढारी

पेरूमध्ये आढळले चक्क ‘देवाचे डोळे’!

पुनो : पेरू देशातील पुनो या ठिकाणी रहस्यमय आकृती आढळून आल्या आहेत. या रहस्यमय आकृती अतिशय अजब आणि अतिविशाल स्वरूपाच्या आहेत. आश्चर्य म्हणजे, केवळ विमानातून आणि सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातूनच त्या पाहता येऊ शकतात. आता या आकृती कशा तयार झाल्या, त्यांची कोणती संस्कृती आहे आणि त्यांची निर्मिती नेमकी केव्हा झाली, याची कोणतीच माहिती उपलब्ध नाही. मात्र, याचा खास पॅटर्न वैशिष्ट्यपूर्ण ठरत आला आहे. पेरूतील पुरातन ठिकाण कॅरल सुपे येथे ही रहस्यमय कलाकृती पाहण्यात आली आहे. ‘देवाचे डोळे,’ असे नाव त्याला देण्यात आले आहे आणि याचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

पूर्वाश्रमीचे ट्विटर व आता एक्स नावाने ओळखल्या जाणार्‍या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याखाली या आकृत्यांबद्दल महत्त्वाची माहिती दिली जात आहे. हा व्हिडीओ केवळ 18 सेकंदांचा असून, ‘वारू वारू’ नावानेही ओळखल्या जाणार्‍या या आकृत्यांबद्दल बरीच माहिती यात देण्यात आली आहे.

यातील काही आकृती देवाच्या डोळ्यांची आठवण करून देणार्‍या आहेत, असे यात म्हटले गेले आहे. इंकास देवाचे प्रतिनिधित्व करणार्‍या इल्ला टेक्सीची यामुळे आठवण येते, अंतर्गत चक्र ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करणारे आहे, असाही यात दावा केला गेला आहे. कॅरल-सुपे हे कॅरल या नावानेही ओळखले जाते. हे ठिकाण जवळपास 5 हजार वर्षे जुने आहे आणि 626 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले आहे, असेही मानले जाते.

Back to top button