एनडीए रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

एनडीए रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : शिवणे-एनडीए रस्त्यावर दररोज होणार्‍या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याचे रुंदीकरण होऊनही फेरीवाले, भाजी विक्रेत्यांसह दुकानदारांची अतिक्रमणे वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. तर दुसरीकडे प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र दिसून येते आहे.

शिंदे पुलापासून कोंढवे धावडे ते खडकवासला धरण चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. या भागाचा महापालिकेत समावेश होऊनही प्रशासनाचे अतिक्रमण कारवाई तसेच वाहतूक वॉर्डन नियुक्तीकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांची संख्याही कमी आहे. हायवे तसेच खडकवासलाकडे जाण्यासाठी जवळचे अंतर असल्याने सिंहगड रस्त्यावरून नांदेड -शिवणे मार्गे तसेच खडकवासला धरणमार्गे शिवणे एनडीए रस्त्यावर येणार्‍या वाहनांची संख्या चार ते पाचपटीने वाढली आहे.

या परिसरात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) अशा मोठ्या शासकीय संस्था आहेत. लोकसंख्याही वाढली आहे. कंपन्या, शाळा, कार्यालय सुरू होण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने वाहने येत आहेत. कोंढवे धावडे, कोपरे चौक, उत्तमनगरपासून शिंदे पूल, गणपती माथ्यापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा फटका पादचार्‍यांसह वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे थांबत नसल्याने पोलिसही हतबल झाले आहेत. बाजारहाट करणारे नागरिक वाहने रस्त्यावरच उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. पीएमपी बस, रिक्षा आदी वाहने अडकून दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.

या समस्येकडे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व शिवछत्रपती फाउंडेशनच्या अध्यक्षा अनिता इंगळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अनिता इंगळे यांच्यासह महिला, युवकांना वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. इतकी गंभीर स्थिती सायंकाळी पाच ते रात्री उशिरापर्यंत निर्माण होत आहे.

वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करून चकाचक रस्ते करण्यात आले. मात्र, वाहतूक वाढल्याने रस्ते अपुरे पडत आहेत. पर्यायी रस्तेही नाहीत. भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

अनिता इंगळे, माजी सदस्या, जिल्हा परिषद.

हेही वाचा

Back to top button