पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारती विद्यापीठ परिसरात दहशत माजविणारा गुंड पप्पू ऊर्फ प्रवीण अनंता येनपुरे टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पप्पू ऊर्फ प्रवीण अनंता येनपुरे (वय 26, रा. आंबेगाव खुर्द), गणेश तमाराम जाधव (वय 19), अजय सदाशिव रेणुसे (वय 25, दोघे रा. अटल चाळ, कात्रज), अनिकेत ऊर्फ गौरव शिवाजी शेंडकर (वय 21, रा. रेणुसे चाळ, कात्रज), यश बाळू म्हसवडे (वय 20, रा. सुंदरनगरी, कात्रज) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत.
येनपुरे आणि साथीदारांविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. येनपुरे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी तयार केला होता. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी संबंधित प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी येनपूरे टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांन आतापर्यंत शहरातील 113 गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.
खडकवासला परिसरातील बहुली गावात महावितरणच्या मनोर्याची तोडफोड करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी पाच लाख रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या. याबाबत विद्युत पारेषण अभियंता आकाश गायकवाड (वय 32, रा. धायरी, सिंहगड रस्ता) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकवासला परिसरातील बहुली गावात राज्य विद्युत पारेषण कंपनीचा मनोरा असून, तेथून बर्याच गावांना वीजपुरवठा केला जातो.
रिक्षा पार्क करत असताना पार्किंगवरून रिक्षाचालक व त्यांचा मुलगा यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार आंबेगाव बुद्रुकमधील टेल्को कॉलनीत घडला. याप्रकरणी निर्मला वमा, अक्षय शिंदे, रोहित देशमुख, साहिल यांच्यासह इतरांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत वैभव विलास कदम (वय 26) यांनी तक्रार दाखल केली असून त्याच्या वडिलांना व भावाला आरोपींनी मारहाण केली आहे.
हेही वाचा