नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश सोहळा रंगला खरा, पण या प्रवेशांमुळे महायुतीतच संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळालीत आमदार सरोज अहिरे या अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असताना याच मतदारसंघातून इच्छूक असलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहिरे यांच्या उमेदवारीला धोका निर्माण झाला आहे. तर छत्रपती उदयनराजेंच्या नातेवाईक सोनालीराजे पवार, काँग्रेसच्या अश्विनी बोरस्ते यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने नाशिक पश्चिम मतदारसंघातील भाजपच्या आमदार सीमा हिरेंची धाकधूक वाढली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.९) भाजपमध्ये विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांसह अनेक महत्वपूर्ण व्यक्तींनी प्रवेश केला. यात देवळाली विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेल्या माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांचाही समावेश आहे. अहिरराव या देवळाली मतदारसंघातून इच्छूक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची निवडणूक तयारी सुरू आहे. यासाठीच त्यांनी तहसिलदारपदाचा राजीनामा देत राजकारणात उडी घेतली आहे. देवळाली मतदारसंघात त्यांनी सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रम सुरू केल्याने या मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे यांनी अहिरराव यांच्यात बेबनाव निर्माण झाला आहे. आता अहिरराव यांनी थेट बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने आ. अहिरेंची डोकेदुखी वाढली आहे. प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारीचे आश्वासन दिले गेले नसल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले नसले तरी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठीच अहिरराव यांनी तहसिलदारपदाचा राजीनामा दिल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामुळे अहिरराव यांच्या प्रवेशामुळे देवळाली मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा ठाकण्याची शक्यता अधिक आहे.
सीमा हिरेंची धाकधूक वाढली
सोनाली राजे पवार आणि काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्विनी बोरस्तेंच्या प्रवेशाने नाशिक पश्चिममधील विद्यमान आमदार सीमा हिरेंची धाकधूक वाढली आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीतच सोनाली राजे पवार या पश्चिममधून इच्छूक होत्या. त्यांच्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे यांनीही फिल्डीग लावली होती. त्यामुळे त्यांच्याकडून हिरेंसमोर आव्हान उभे केले जाण्याची शक्यता आहे. तर अश्विनी बोरस्ते या देखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याने या मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे.
हेही वाचा :