Crime News : परदेशी नागरिकाच्या सदनिकेवर गोळीबार

file photo
file photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बाणेर भागात राहणार्‍या एका परदेशी नागरिकाच्या सदनिकेवर मंगळवारी (दि. 7) सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. खिडकीची काच फुटल्याने हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान, कोणी खोडसाळपणे हवेत गोळी झाडली की, चुकून कोणाकडून फायर झाले, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी 36 वर्षीय दक्षिण कोरियन नागरिकाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोळी झाडणार्‍या अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चाकण येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत रिसर्च अँड डेव्हल्पमेंट विभागात कामाला आहेत. गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी हे पत्नी व तीन वर्षांच्या मुलींसोबत बाणेर भागातील नागरास रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत 10व्या मजल्यावर राहायला आहेत. ते मंगळवारी सकाळी झोपेतून उठून मोबाईलवर मेसेज पाहत होते. त्या वेळी 6 वाजून 10 मिनिटांनी गॅलरीची काच फुटल्याचा आवाज आला.

या वेळी फिर्यादी यांनी कशाचा आवाज आला म्हणून पाहायला गेले तेव्हा बेडरूमच्या काचेच्या स्लायडिंग दरवाजाला छिद्र पडल्याचे दिसले. तसेच गॅलरीची काच फुटलेली दिसली आणि गोळीचा समोरील तुकडा बेडला लावलेल्या मच्छरदाणीत अडकल्याचे दिसून आले. फिर्यादीने हा प्रकार त्यांच्या दुतावासाच्या कानावर घालून, चालकाला माहिती दिली. यानंतर चालकाने ही गोष्ट पोलिसांना सांगितली. तत्काळ चतुःशृंगी पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण करीत आहेत.

कोणती बंदूक होती?

दक्षिण कोरियन नागरिकाच्या सदनिकेवर कुठल्या प्रकारच्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला आहे, हे स्पष्ट झाले नाही. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर किंवा आरोपी पकडला गेल्यानंतर ही गोळी कुठल्या बंदुकीची होती हे कळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news