पुणे : पुढारी वृत्तसेवा : कंपनीची बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे पॉवर ऑफ अॅटर्नी तयार करत 89 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणाची पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंग्जमार्फत चौकशी करण्यात आली. गुन्ह्यात अपहार झाल्याचे सिद्ध होताच बंडगार्डन पोलिस ठाण्यात अविनाशकुमार सिंह राजेंद्रप्रसाद सिंह (वय 40) याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात, राजेंद्र लटकन पाटील यांनी अॅड. सुदीप केंजळकर यामार्फत इकॉनॉमिक ऑफेन्स विंग्जकडे तक्रार दाखल केली.
फिर्यादी यांची कॅटस्किल इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मध्यप्रदेशातील काम पाहण्यासाठी अविनाशकुमार सिंह राजेंद्रप्रसाद सिंह (वय 40) याची नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान, सिंहने कंपनीच्या बनावट कागदपत्रांसह कंपनीतील व्यवहारांबाबत बनावट पॉवर ऑफ अटर्नी तयार केली. त्याआधारे, त्याने कंपनीचे बँक खाते त्रयस्थ कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर करून ते कंपनीच्या जॉईंट अकाउंटमध्ये कन्व्हर्ट केले. याद्वारे त्याने खात्यातील जवळपास 89 कोटी रुपयांचा अपहार केला. यादरम्यान, फिर्यादी यांनी सिंह याच्याकडे वारंवार कंपनीची बिले मागवून हिशोबाची विचारणा केली.
त्यावेळी, बिलांचे इनव्हाईस मिळाल्यानंतर कळवतो व पाठवतो असे सिंह याने पाटील यांना सांगितले. मात्र, कोणताही हिशोब सादर केला नाही. कंपनीने दीड ते दोन कोटींचा जीएसटी थकविल्याने कंपनीचे संचालक असलेल्या राजेंद्र पाटील यांना जीएसटी विभागाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले. या वेळी, कंपनीकडून जी बिले आली होती त्यांचा जीएसटी थकविल्याने वॉरंट आल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आले. या वेळी, त्यांनी कंपनीतील व्यवहारांची माहिती घेण्यास सुरवात केली. जीएसटीचे प्रकरण ज्या खात्याशी संबंधित होते त्याबाबत त्यांनी बँकेकडे विचारणा केली. मात्र, पाटील यांना सहकार्यास बँकेने नकार केला.
अखेर, त्यांनी बँकेकडे आपण कंपनीचे मालक असून, ते खाते आमच्या नावाचे आहे याबाबत कायदेशीर गोष्टी पार पाडल्या. त्यानंतर बँककडून पाटील यांना खात्याचे विवरणपत्र देण्यात आले. त्यानंतर, कंपनीच्या रकमेचा अपहार झाला असून, जीएसटीसह विविध प्रकरणात त्यांना न्यायालयाकडून समन्स तसेच नोटीस आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंग्जला याबाबत माहिती दिली. या पथकामार्फत चौकशी करण्यात आली. गुन्ह्यात अपहार झाल्याचे सिद्ध होताच बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
सिंह यांने मध्य प्रदेशातील एकासोबत मिळून जॉईंट व्हेंचर केले असून, त्याची फसवणूक केल्याने त्याने त्याविरोधात भोपाळ येथे तक्रार दाखल केली आहे. त्याप्रकरणात त्याला अटकही झाली होती. पुण्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. उच्च न्यायालयाकडून त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तर, अंतिम जामिनावर उच्च न्यायालयात अद्याप युक्तिवाद सुरू असून, त्याला जामीन देण्यास अॅड. सुदीप केंजळकर यांसह अॅड. सुवर्णा शिंदे यांनी विरोध केला आहे. या प्रकरणात त्याला अद्याप अटक झालेली नाही
हेही वाचा