गाईच्या दूध खरेदीचा दर सरसकट 30 रुपये; १ मार्चपासून अंमलबजावणी

गाईच्या दूध खरेदीचा दर सरसकट 30 रुपये; १ मार्चपासून अंमलबजावणी

पुुणे : पुढारी वृत्तसेवा

दूध उत्पादक प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत गाईच्या दूध खरेदी दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, 1 मार्चपासून सरसकट लीटरला 30 रुपये खरेदी दर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे मागणी वाढल्याने दूध पावडर आणि बटरचे दर आणखी वाढले आहेत. त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फायदा पंधरा दिवसांत गाईच्या दूध दरात सहा ते सात रुपयांनी वाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

ईच्या दुधाचा विक्री दर लिटरला 48 रुपये असा स्थिरच ठेवण्यात आल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारातून पावडरला अशीच वाढती मागणी राहिल्यास दूध खरेदीचे दर आणखी वाढण्याचा अंदाज बैठकीत वर्तविण्यात आला. राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांचे नेतृत्व करणारी दूध उत्पादक प्रक्रिया व व्यावसायिक कल्याणकारी संघाची महत्त्वपूर्ण बैठक संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 27) रात्री येथील एका हॉटेलमध्ये झाली. त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

बैठकीनंतर याबाबत माहिती देताना कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले की, ज्या सहकारी आणि खासगी दूध संघांकडून गाईच्या दुधाची खरेदी लिटरला 27 रुपयाने होत आहे, ते तीन रुपये वाढ करतील. जे संघ 28 आणि 29 रुपयांनी दूध खरेदी करीत होते ते अनुक्रमे दोन रुपये आणि एक रुपया वाढवणार आहेत. त्यामुळे 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या गाईच्या दुधाची खरेदी एक मार्चपासून सरसकट 30 रुपये दराने होणार आहे.

पावडर, बटर दरात आणखी वाढ

रशिया-युक्रेनच्या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारात दूध पावडर आणि बटरच्या दरवाढीवर झाला आहे. जागतिक बाजारात पावडर निर्यातीत युक्रेनचाही वाटा आहे. तेथून निर्यात बंद झाल्याने भारतीय दूध पावडरला जागतिक बाजारातून मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध पावडरचे भाव किलोस 260 ते 270 रुपयांवरून वाढून 280 ते 300 रुपये आणि बटरचे भाव 340 ते 350 रुपयांवरून वाढून 380 ते 400 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे दूध खरेदीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून दूध खरेदीचे दर वाढविण्यात आल्याचेही म्हस्के आणि कुतवळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news