पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या सुचनेनुसार वय वर्षे 15 ते 18 वयोगटामधील (जन्माचे वर्ष सन 2007 व त्यापूर्वीचे) मुलांचे कोविड-19 लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात लसीकरण सुरू झाल्यापासून दोन दिवसांत 2 हजार 187 मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.लसीकरणासाठी शहरातील आठ केंद्रांवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पालक जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून पाल्यास लस देत आहेत.
मुलांना सर्व केंद्रावर कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे.
शाळा पूर्वीसारख्या नियमित सुरू होण्यासाठी 18 वयोगटाच्या आतील मुलांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.लसीकरणासाठी पूर्वनोंदणी करून पालक मुलांना सकाळीच लसीकरण केंद्रावर घेवून येत आहेत.
नोंदणी करून लस दिल्यानंतर अर्धा तास मुलांना निरीक्षणाखाली ठेवून मगच घरी सोडण्यात येत आहे.