

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिकेसह नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. ओला आणि सुका कचर्याचे विलगीकरण करून नागरिक आपली जबाबदारी पार पाडत आहे. शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. स्वच्छ शहर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सफाई कर्मचारी मित्र यांच्यासह शहरातील नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
महापालिकेच्या वतीने इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित केला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून शनिवारी (दि. 16) सकाळी प्राधिकरण-सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र, अप्पू घर प्रवेशद्वार, निगडी येथे सेवा सुरक्षा अभियानाचे आयोजन केले होते. या वेळी आयुक्त सिंह बोलत होते.
कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उप-आयुक्त मनोज लोणकर, सह-शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, त्याचप्रमाणे, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, महापालिका अधिकारी- कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेखर सिंह म्हणाले, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचर्याचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचार्यांबरोबरच विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेऊन शहर स्वच्छ ठेवण्याबाबत आपल्या पालकांना जागरूक केले पाहिजे. इंडियन स्वच्छता लीगमध्ये मपीसीएमसी पायोनिअर्सफ हा आपला संघ शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी सज्ज आहे. सगळ्यांनी या संघाचे प्रतिनिधित्व करून शहराच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी विजयाचा इंद्रधनुष्य पेलला पाहिजे.
अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाल्या, जिथे स्वच्छता असते तेथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहते. परदेशातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण झाली, त्यांनी ती जोपासली. त्यामुळे त्यांची शहरे स्वच्छ आहेत. आपली शहरे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. प्रत्येकाने याची सुरूवात स्वत:पासून केली पाहिजे. ही स्वच्छतेची परंपरा अशीच पुढच्या पिढीपर्यंत गेल्यास लवकरच आपला देश आणि आपले शहर स्वच्छ, सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियान ब—ॅन्ड ऍम्बेसिडर राष्ट्रीय कबड्डीपटू पुजा शेलार तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलन महिला अध्यक्षा संगिता किशोर जोशी- काळभोर यांचा सत्कार करण्यात आला.
अभियानाच्या दुसर्या भागामध्ये 17 ते 25 सप्टेंबर रोजी सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. महानगरपालिका तसेच संस्थेचे सर्व स्वच्छताविषयक कामकाज करणारे कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करावयाची आहे. त्यामध्ये साधारण 3 ते 4 हजार कर्मचार्यांची महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक यांनी स्वच्छता मोहीम राबविली. ओला व सुका कचरा संकलित करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. दरम्यान, सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व वॉर्डमध्ये शुक्रवारी (दि. 15) इंडियन स्वच्छता लिग 2.0 अंतर्गत घरोघरी जाऊन सहभागकर्त्यांची नोंदणी, मिरवणूक, स्वच्छता शपथ व पथनाट्य आदींचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये अंदाजे 2 हजार नागरिकांनी इंडियन स्वच्छता लिग 2.0 साठी नोंदणी केली आहे. नागरिक व युवकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा