बारामती : पुढारी वृत्तसेवा
बारामती येथील मातोश्री या हॉटेलातील आचारी गणेश प्रभाकर चव्हाण (रा. मालेगाव, जि. नाशिक) याचा खून करुन पंजाबला पलायनाच्या तयारीत असलेल्या विकास दीपक सिंग (वय २९, मूळ रा. चंदिगड, पंजाब, सध्या रा. आमराई बारामती) याला बारामती तालुका पोलिसांनी तासाभरातच जेरबंद केले.
माझ्या ताब्यातील किचनमध्ये तू पाय ठेवायचा नाही असे म्हटल्याच्या कारणावरुन सिंग याने चिडून जात चव्हाण याचा खून केला. पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली.
शुक्रवारी (दि. १३) रात्री सव्वा दोनच्या सुमारास सिंग याने आचाऱ्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार करत त्याचा खून केला. त्यानंतर भीतीपोटी तो पंजाबला पोबारा करण्याच्या तयारीत होता. मात्र घटनेचीमाहिती मिळताच महेश ढवाण यांच्यासह लेंडवे, तपास पथकातील सहाय्यक फौजदार भागवत, अंमलदार राम कानगुडे, पोलिस नाईक रणजित मुळीक, पोलिस शिपाई प्रशांत राऊत, अमोल नरुटे आदींनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला. बारामतीतील माळावरची देवी परिसरातून संशयित आरोपीला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल घुगे अधिक तपास करत आहेत.
बारामतीतील हॉटेल मालकांनी आपल्याकडे कामावर ठेवलेल्या कामगारांची सर्व माहिती पोलिस ठाण्याना द्यावी. कामगारांची आधारकार्ड ठेवावेत. आपण कामावर ठेवत असलेले कामगार गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत ना? याची खात्री करावी. अन्यथा हॉटेल मालकावरच गुन्हे दाखल केले जातील.
– महेश ढवाण, पोलिस निरीक्षक, बारामती तालुका पोलिस ठाणे