पुणे : सात मेट्रो स्थानके ‘एकसाथ’

पुणे : सात मेट्रो स्थानके ‘एकसाथ’
Published on
Updated on

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : न्यायालयापासून रामवाडीपर्यंतची मेट्रो लवकर सुरू करण्यासाठी मार्गावरील सातही स्थानकांची कामे युद्धपातळीवर केली जात आहेत. वर्षअखेरीपर्यंत या मार्गावर मेट्रो धावण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे.

या मार्गावरील मंगळवार पेठ आणि पुणे रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो स्थानके 70 टक्के पूर्ण झाली. स्थानकांवरील अंतिम टप्प्यातील कामे येत्या दोन महिन्यांत होतील. रुबी हॉल क्लिनिकजवळील स्थानकाचे साठ टक्के, तर बंडगार्डनजवळील स्थानकाचे पन्नास टक्के काम झाले आहे. येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी या अन्य तीन स्थानकांची कामे प्राथमिक टप्प्यावर आहेत. गर्दीच्या या मार्गावरील खांब आणि व्हायाडक्टचे (पुलाचे) बहुतांश काम काही अपवाद वगळता पूर्ण झाले आहे. पाच खांबांचे काम राहिले असून, त्यात कल्याणीनगरमधील दोन, कामगार पुतळ्याजवळील एक आणि लोहमार्गाजवळील दोन खांबांचा समावेश आहे.

पुणे रेल्वे स्थानकालगत मेट्रो स्टॉपसाठी स्वतंत्र मार्ग बांधण्यात आला आहे.
पुणे रेल्वे स्थानकालगत मेट्रो स्टॉपसाठी स्वतंत्र मार्ग बांधण्यात आला आहे.

रेल्वे सिग्नलच्या केबळ हटविण्यास लागला वेळ

मेट्रोने रेल्वेकडे आठ महिन्यांपूर्वी लोहमार्ग ओलांडण्यासाठीच्या जागेची रक्कम भरली. मात्र, रेल्वेकडून आठवड्यापूर्वी जागा मिळाली. रेल्वे सिग्नलच्या 22 केबल त्या जागी असल्याने त्या हटविण्यास वेळ लागला. काही केबल काढल्यानंतर तेथील मेट्रोच्या दोन खांबांसाठी पायलिंगचे काम हाती घेण्यात आले. बारापैकी नऊ पाईल घेतल्या आहेत. लवकरच पाईल पिलर कॅप बसविण्यात येईल. खांब उभारणीच्या वेळी खबरदारी म्हणून तेथे मायक्रो पायलिंगही करण्यात येणार आहे. या खांबांवर लोखंडी गर्डर टाकण्यासाठी रेल्वेचा दोन तास ब्लॉक घ्यावा लागेल. हे काम ऑक्टोबरपर्यंत संपविण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. हा गर्डर टाकल्याशिवाय मेट्रो न्यायालयापासून पुढे जाऊ शकणार नाही.

स्टेशन ते बंडगार्डन लोहमार्ग व सिग्नलची कामे सुरू

रेल्वे स्थानकापासून बंडगार्डनपर्यंतचा व्हायाडक्ट म्हणजे पूल पूर्ण झाला आहे. तेथे लोहमार्ग व सिग्नलची कामे सुरू झाली आहेत. बंडगार्डन चौकात ऑगस्टपर्यंत लोखंडी गर्डर टाकण्यात येईल. बंडगार्डनजवळ नदीवरील दोन पुलांच्या मधल्या जागेत दहा खांबांवर बांधलेला मेट्रोचा तिरका पूल अतिशय आकर्षक दिसत आहे. पर्णकुटी चौकातही मोठे अंतर असल्याने तेथे ऑगस्टपर्यंत लोखंडी गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईल. दोन दिवसांत 90 मीटर लांबीचा गर्डर तेथे पोहोचेल.

येरवड्यात गुंजन चौकातील मेट्रो स्थानकानंतर नगर रस्त्यावरून मेट्रोमार्ग वनखात्याच्या जागेत प्रवेश करतो. तेथून तो कल्याणीनगरवरील डीपी रस्त्यावर पोहोचतो. गुंजन चौकापासून गोल्ड जिमपर्यंतचे काम पूर्ण झाले. तेथील भूसंपादनाचा वाद या आठवड्यात संपला. वादामुळे तेथील दोन खांबांची उभारणी रखडली आहे.

अंतिम टप्प्यात असलेले मेट्रो स्थानकाचे काम. (छाया : यशवंत कांबळे)
अंतिम टप्प्यात असलेले मेट्रो स्थानकाचे काम. (छाया : यशवंत कांबळे)

आरटीओजवळ पॉकेट ट्रॅक

पौड रस्त्यावर मेट्रोचा डेपो आहे, तर दुसर्‍या मार्गावर मध्यभागी खडकी रेंजहिल्स येथे डेपो आहे. त्यामुळे अन्य मार्गावर अडचण आल्यास मेट्रो डेपोत नेता येईल. न्यायालय ते रामवाडी या मार्गात मेट्रोला अडचण आल्यास, मेट्रो उभी करण्यासाठी आरटीओ कार्यालय ते रेल्वे स्थानकायादरम्यान 260 मीटर लांबीचा पॉकेट ट्रॅक बांधला आहे. त्यावर मेट्रो दुरुस्तीसाठी उभी करून, अन्य मेट्रो गाड्या मार्गस्थ करण्याचे नियोजन आहे. या ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात आहे.

बंडगार्डनपर्यंत दिवाळीच्या सुमारास, तर संपूर्ण मार्गावर वर्षअखेरीला मेट्रो धावण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात येत आहे. भूसंपादनातील अडचणी दूर झाल्याने, उर्वरित कामे वेगाने करण्यावर भर दिला आहे.

– अतुल गाडगीळ, संचालक, महामेट्रो.

न्यायालय ते रामवाडी मेट्रो

एकूण झालेले
खांब : 326 321
पुलाचे स्पॅन : 306 272

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news